Lalbaugcha Raja Visarjan 2025 मुंबई: लालबाग राजा मंडळ (Lalbaugcha Raja Visarjan 2025) गिरगाव चौपाटीचे नाखवा हिरालाल वाडकर (Hiralal Wadkar) यांच्यावर अब्रू नुकसानीचा दावा ठोकणार आहे. समुद्राला मोठी भरती असल्याने लालबाग राजाचे विसर्जन रविवारी (7 सप्टेंबर) विलंबाने झाले.  मात्र विसर्जनाबाबत हिरालाल वाडकर यांनी खोटी माहिती पसरवून बदनामी केली. त्यामुळे वाडकर यांच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात अब्रू नुकसानीच्या दावा दाखल करण्याचा निर्णय लालबाग राजा मंडळाने घेतला आहे. 

लालबाग राजाच्या विसर्जनाबाबत सोशल मीडियात विनाकारण वावड्या उठवण्यात आल्या. त्यासाठी हिरालाल वाडकर यांच्या दाव्याचा आधार घेण्यात आला. हिरालाल वाडकर यांचा लालबाग राजा मंडळाशी काही संबंध नाही. कधीच त्यांनी राजाचे विसर्जन केले नाही. केवळ प्रसिद्धी आणि बदनामीच्या हेतूने हिरालाल वाडकर व्हिडिओ प्रसिद्ध केला असल्याचे लालबाग राजा मंडळाचे म्हणणे आहे. 

हिरालाल वाडकर नेमकं काय म्हणाले होते?

आम्ही वाडकर बंधू अनेक वर्षापासून लालबाग राजाचे विसर्जन करत आहोत. यंदा मात्र मंडळाने गुजरातच्या कंपनीला कंत्राट दिले आणि गणित चुकले, अशी प्रतिक्रिया माध्यमांमध्ये हिरालाल वाडकर यांनी दिली होती. भरती ओहीटीचा अंदाज लालबागच्या मंडळाला आला नाही. आम्ही वाडकर बंधू अनेक वर्षांपासून लालबागच्या राजाचे विसर्जन करत आलो आहोत. गुजरातचा तराफा आल्यामुळे हे कॉन्ट्रॅक्ट त्यांनी त्यांना दिलेलं आहे. यापुढी मंडळाने  विसर्जनाची काळजी घ्यायला हवी, अशी प्रतिक्रिया हिरालाल वाडकर यांनी माध्यमांशी बोलताना दिली होती. आता हिरालाल वाडकर यांच्या या वक्तव्याविरोधात लालबाग राजा मंडळाने कोर्टात अब्रू नुकसानीचा दावा ठोकण्याचा निर्णय घेतला आहे.

तब्बल 33 तासांनंतर लालबागच्या राजाचं विसर्जन-

मुंबईच्या गणेशोत्सवाचं सर्वात भव्य आकर्षण असलेल्या लालबागच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीत यंदा अभूतपूर्व खोळंबा पाहायला मिळाला. 6 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वाजता सुरू झालेली मिरवणूक तब्बल 33 तासांनंतर, 7 सप्टेंबरच्या रात्री उशिरा अखेर गिरीगाव चौपाटीवर विसर्जनानं संपन्न झाली. यंदा लालबागच्या राजाच्या मूर्तीच्या विसर्जनासाठी गुजरातमध्ये बनवण्यात आलेल्या मोटराइज्ड तराफ्याचा वापर करण्यात आला. मात्र, या तराफ्यावर मूर्ती विराजमान करण्याची प्रक्रिया अत्यंत किचकट आणि वेळखाऊ ठरली. अनेक तासांच्या प्रयत्नांनंतर अखेर मूर्ती तराफ्यावर स्थिर करण्यात यश आलं. मूर्ती तराफ्यावर विराजमान झाल्यानंतरही, समुद्रात योग्य भरतीची प्रतीक्षा करावी लागली. भरतीची योग्य पातळी रात्री 9 वाजता प्राप्त झाल्यानंतरच विसर्जनाची प्रक्रिया सुरू झाली आणि लालबागच्या राजाचं विसर्जन पार पडलं. 33 तासांच्या रखडलेल्या प्रक्रियेमुळे लाखो भाविकांना अपार संयम आणि श्रद्धेची कसोटी लागली होती.

संबंधित बातमी:

Lalbaugcha Raja Visarjan 2025: लालबागच्या राजा मंडळाला ती चूक भोवली; सुधीर साळवींनी सांगितलं कारण, नेमकं काय घडलं?