Shoumika Mahadik on Satej Patil : गोकुळच्या (Gokul) चाचणी लेखापरीक्षणाचे आदेश देण्यात आल्यानंतर सत्ताधारी आघाडीचे नेते आमदार सतेज पाटील (Satej Patil) आणि विरोधी गटातील महाडिक गटाच्या संचालिका शौमिका महाडिक (Shoumika Mahadik)यांच्यातील कलगीतुरा सुरुच आहे. सतेज पाटील यांनी केवळ दोन वर्ष कशाला, 25 वर्षांचे लेखापरीक्षण करा, अशी टीका केल्यानंतर आता शौमिका महाडिक यांनीही जोरदार पलटवार केला आहे.
शौमिका महाडिक यांनी पत्रक प्रसिद्धीस देऊन सतेज पाटलांवर टीकास्त्र सोडले आहे. त्यांनी म्हटले आहे की, "तुमची सत्ता आहे. 25 वर्षातील कारभार काढण्यापासून तुम्हाला कोणी अडवलं नाही. वैयक्तिक खुन्नस ठेवून तुम्ही गोकुळ संघाची बदनामी केली." पत्रकात पुढे म्हटले आहे की, "माजी पालकमंत्री यांच्या पत्रकार परिषदेचा व्हिडीओ ‘गोकुळ’च्याच एका कर्मचाऱ्याच्या माध्यमातून माझ्या पाहण्यात आला. गोकुळमध्ये सतेज पाटील यांची सत्ता आहे. त्यामुळे 25 वर्षातील कारभार काढण्यापासून त्यांना कोणी रोखलेलं नाही. तरीही वैयक्तिक खुन्नस ठेऊन त्यांनी संघाची जेवढी बदनामी करायची तेवढी केलीच. त्याचेही पुरावे माझ्याकडे आहेत."
शौमिका महाडिक पुढे म्हणतात, "ज्या टँकरच्या मुद्यावरुन तुम्ही वाद घातला. त्या मुद्यावरुन तुमची सत्ता असताना भ्रष्टाचार काय आहे दाखवा यासाठी पत्र दिलं होतं. त्या विषयात तुमच्या या सत्तेत क्लीनचिट दिलेलं पत्र मला मिळालं. आजही माझं आव्हान आहे, तुम्ही आमचा भ्रष्टाचार दाखवा. मागच्या 2 वर्षाचा हिशोब मी मागणार. कारण या कालावधीत मी स्वतः संचालक आहे. 5 वर्षासाठी जसे तुम्ही निवडून आले, तसंच मी पण संचालक म्हणून निवडून आले. त्याच माणसांनी मलाही संचालक म्हणून निवडून दिलं. मग माझ्या एकाही पत्राचं उत्तर देण्याचं धाडस तुम्ही का दाखवलं नाही? सतेज पाटील यांनी वायफळ बडबड बंद करावी. याची सगळी उत्तरं एक दोन दिवसात पत्रकार परिषद घेऊन नक्की देईन. त्यांनतर खरं कोण आणि खोटं कोण हे कोल्हापूर जिल्ह्याला कळेल.
केवळ दोन वर्षांची कशाला 25 वर्षांचे लेखापरीक्षण करायला पाहिजे
दरम्यान, सतेज पाटील यांनी गोकुळमधील चौकशीच्या आदेशावर प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, "आम्ही ठरवलं असतं तर गोकुळसोबत राजाराम कारखान्यावर प्रशासक आणू शकलो असतो. आम्ही सत्तेचा वापर करुन कुणावर सूडबुद्धीने कारवाई केली नाही. केवळ दोन वर्षांची कशाला 25 वर्षांचा लेखापरीक्षण करायला पाहिजे. महाविकास आघाडीचे सरकार होते त्यावेळी काँग्रेसचेच केदार दुग्धविकास मंत्री होते. त्यामुळे आम्ही ठरवलं असतं, तर गोकुळसोबत राजाराम कारखान्यावर प्रशासक आणू शकलो असतो."
'त्या' नेत्यांचे संचालक असूनही चौकशी लागत असेल, तर स्वागत
'गोकुळ'मध्ये (Gokul) चाचणी लेखापरीक्षणाचे आदेश देण्यात आल्यानंतर सत्ताधाऱ्यांकडूनही प्रतिक्रिया उमटल्या आहेत. सत्ताधारी आघाडीचे नेते आमदार हसन मुश्रीफ यांनी निर्णयाचे स्वागत असल्याचे म्हटले आहे. मुश्रीफ पुढे म्हणाले, गोकुळमध्ये खासदार संजय मंडलिक, आमदार विनय कोरे, आमदार प्रकाश आबिटकर, यांच्या गटाचे संचालक असतानाही गोकुळमध्ये चाचणी लेखापरीक्षण लागत असल्यास त्या निर्णयाचे स्वागत आहे. मुश्रीफ पुढे म्हणाले की, गोकुळ निवडणुकीत दूध दरात दोन रुपयांची दरवाढ करु अशी आम्ही घोषणा केली. मात्र, प्रत्यक्षात आठ रुपये दरवाढ देण्यात आली आहे. प्रति लिटरला चारपट दरवाढ देण्यात आली.
इतर महत्वाच्या बातम्या