Ambabai Mandir : करवीर निवासिनी श्री अंबाबाईच्या (Ambabai Mandir) किरणोत्सव मार्गामध्ये अजूनही अडथळे कायम आहेत. या पार्श्वभूमीवर पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने कोल्हापूर महानगरपालिकेला महाद्वार रोडवरील अतिक्रमणे काढण्यासाठी पत्र लिहिले आहे. किरणोत्सवाला कोणताही अडथळा येऊ नये, यासाठी देवस्थान समितीने मनपाला पत्र पाठवले आहे. अंबाबाई मंदिरात किरणोत्सव 30 जानेवारीपासून सुरू होणार आहे. त्याच तयारीचा एक भाग म्हणून, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने किरणोत्सव मार्गाचे सर्वेक्षण केले. या सर्वेक्षणानंतर सूर्यकिरणांच्या मार्गात अजूनही अनेक अडथळे असल्याचे आढळून आले. दरम्यान, मनपा अधिकारी आणि पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे सदस्य पुन्हा एकदा 23 जानेवारी रोजी मावळत्या सूर्याच्या किरणांचे संयुक्तपणे सर्वेक्षण करणार आहेत. 

Continues below advertisement

पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे म्हणाले की, अंबाबाई मंदिर, किरणोत्सव मार्गावरील अडथळे कोल्हापूर मनपाने तातडीने दूर करावेत, अशी मागणी करणारे पत्र देवस्थान समितीच्या वतीने प्रशासनाला देण्यात आले आहे. किरणोत्सव मार्गातील अडथळ्यांची पाहणी 23 जानेवारीला करायची असून सर्वेक्षणासाठी मनपाचे शहर अभियंता, नगररचना सहायक अभियंता, बी वाॅर्ड अधिकारी यांनी प्रत्यक्ष उपस्थित राहावे, असे आवाहनही आम्ही केले आहे. अंबाबाई मंदिरात वर्षातून दोनदा किरणोत्सव साजरा केला जातो. यामध्ये 29 जानेवारी ते 2 फेब्रुवारी आणि यानंतर 9 ते 12 नोव्हेंबर या कालावधीत किरणोत्सव सोहळा साजरा केला जातो. 

दरम्यान, 9 ते 12 नोव्हेंबर या कालावधीत झालेल्या किरणोत्सवावेळी काही इमारतींचे पत्रे, फलक, झाडाच्या फांद्या असे विविध अडथळे असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे किरणोत्सव अपूर्ण राहून भाविकांची निराशा होते. या पार्श्वभूमीवर आगामी 30 जानेवारीपासून सुरू होणाऱ्या किरणोत्सवापूर्वी हे अडथळे काढावे लागणार असल्याचेही निवेदनात म्हटले आहे.

Continues below advertisement

इतर महत्वाच्या बातम्या