Karnataka Bhavan at Sidhgiri Kaneri Math : कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सोमवारी कोल्हापुरातील सिद्धगिरी कणेरी मठात कर्नाटक भवन उभारणीसाठी पायाभरणी केली. या कर्नाटक भवनला शिवसेनेनं कडाडून विरोध केला आहे. त्यामुळे कोल्हापूरमध्ये नवीन वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.


शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार आणि शहरप्रमुख रविकिरण इंगवले यांनी कणेरी मठातील कर्नाटक भवनला कडाडून विरोध केला आहे. वर्षानुवर्ष कर्नाटक सरकार सीमाभागातील मराठी भाषिकांची गळचेपी करत असताना महारास्ट्रात 'कर्नाटक' हे नाव कशासाठी? असा सवाल जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी केला आहे. महाराष्ट्रात कर्नाटक भवन हे राज्य सरकारचं अपयश असून कोणत्याही परिस्थितीत हा प्रयत्न हाणून पाडण्याचा इशारा देखील त्यांनी दिला आहे.  


शहरप्रमुख रविकिरण इंगवले यांनीही विरोधाची तोफ डागली. धार्मिक कार्यक्रमाच्या आडून कोणी राजकीय पक्षांचे काम करणार असेल, तर त्याला थारा दिला जाणार नाही, असा इशारा रविकिरण इंगवले यांनी दिला आहे. शिवसेनेकडून देण्यात आलेल्या इशाऱ्यावरून कर्नाटक भवनमुळे वाद निर्माण होण्याची चिन्हे आहेत. 


कणेरी मठावर कर्नाटक भवनची पायाभरणी 


दरम्यान, कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सोमवारी कोल्हापुरातील सिद्धगिरी कणेरी मठात कर्नाटक भवन उभारणीसाठी पायाभरणी केली. भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस बी.एल. संतोष, केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी, शशिकला जोल्ले आणि बोम्मई मंत्रिमंडळातील दहा मंत्री या कार्यक्रमाला उपस्थित होते. कर्नाटक भवनासाठी एकूण 7 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. बोम्मई यांनी जाहीर केले की या कामासाठी तातडीने 3 कोटी रुपये दिले जातील. त्यांनी ट्विट केले की, कोल्हापूरमधील कणेरी मठावर कर्नाटक भवनचे बांधकाम सुरू केलं आहे.


मठाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, कर्नाटक भवन हे विद्यार्थी, तज्ज्ञांसाठी सेवा देईल. ज्यांना या ठिकाणी राहून संशोधन करायचे किंवा मठात विकसित केलेल्या मॉडेल्सचा अभ्यास करायचा आहे. मठातील मोठ्या संख्येने येणारे पर्यटक तसेच  भाविक कर्नाटकातील आहेत आणि ते देखील या सुविधेचा लाभ घेऊ शकतात.


कणेरी मठ काडसिद्धेश्वर महाराज चालवतात, जे देशी गायींच्या संवर्धनासाठी, सेंद्रिय शेतीसाठी ओळखले जातात. कणेरी मठावर महाराष्ट्र आणि कर्नाटकातील पर्यटक तसेच भाविक मोठ्या संख्येने येत असतात. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत, अण्णा हजारे, योगगुरू बाबा रामदेव आणि इतर अनेक व्यक्तींनी यापूर्वी मठाला भेट दिली आहे.


इतर महत्वाच्या बातम्या