Shivsena on Sanjay Mandlik : कथित बनावट प्रतिज्ञापत्र आरोपांवरून कोल्हापूरमध्ये शिवसेनेतील दोन्ही गट पुन्हा आमनेसामने आले आहेत. शिंदे गटातील बंडखोर खासदार संजय मंडलिक यांनी भाडोत्री शब्द वापरल्याने शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी आज कोल्हापूरमध्ये आंदोलन करत कडक इशारा दिला. शिवसैनिकांचा भाडोत्री असा उल्लेख केल्याचा संताप या आंदोलनात पहायला मिळाला.
शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून कोल्हापूरमध्ये खासदार संजय मंडलिक यांच्या विरोधात निदर्शनं करण्यात आली. शिवसैनिकांना भाडोत्री हा शब्द वापरल्याबद्दल हे आंदोलन करण्यात आले. जिल्हाप्रमुख संजय पवार यांच्या नेतृत्वाखाली बिंदू चौकात हे आंदोलन करण्यात आलं. यावेळी शिवसैनिकांनी खासदार मंडलिक यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. दरम्यान, उद्धव ठाकरे यांना समर्थन देण्यासाठी ठाकरे गटाकडून देण्यात आलेल्या प्रतिज्ञापत्रांची मुंबई गुन्हे शाखेकडून कोल्हापुरात चौकशी सुरू आहे. यावर प्रतिक्रिया देताना खासदार संजय मंडलिक यांनी शिवसेनेला भाडोत्री शिवसैनिक आणायची गरज नव्हती असं वक्तव्य केलं होतं.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने मंडलिक यांना खासदार करण्यासाठी आम्ही जीवाचे रान केले आणि याच मंडलिकांनी विश्वासघात केला. कोल्हापूरची स्वाभिमानी जनता 2024 च्या निवडणुकीत मंडलिक यांना धूळ चारेल. 100 खोके, भाडोत्री संजय मंडलिक ओके ही टॅगलाईन आम्ही घराघरात पोहाचवणार असल्याचे संजय पवार म्हणाले.
भाडोत्री माणसं गोळा करावी लागत आहेत
दरम्यान, संजय मंडलिक यांनी काल प्रतिज्ञापत्रावरून बोलताना टीका केली होती. शिवसैनिकांना अशा पद्धतीने काम करण्याची गरज नाही. जो सच्चा शिवसैनिक आहे तो प्रतिज्ञापत्र देईलच, पण बोगस करण्याची गरज नाही. त्यामुळे आम्हाला गद्दार म्हणायचं, पण खऱ्या शिवसेनेचा विचार कोणी सोडला हे लक्षात येत आहे. त्यामुळे भाडोत्री माणसं गोळा करावी लागत आहेत. बनावट प्रतिज्ञापत्र सक्षम अधिकारी चूक की बरोबर ठरवतील.
70 टक्के लोकप्रतिनिधी शिंदे गटाकडे
दरम्यान, शिंदे गटाला ढाल आणि तलवार चिन्ह मिळालं असलं, तरी ते तात्पूरतं आहे. शिवधनुष्य चिन्ह आम्हालाच मिळणार असल्याचा दावाही त्यांनी केला. संजय मंडलिक म्हणाले, खोटी शपथपत्र मुंबईत सापडली त्याचा तपास महाराष्ट्रात सुरु आहे. सच्च्या शिवसैनिकांनी खोट्या पद्धतीची कागदपत्रे तयार करायला नको होती, न्यायालयात त्याचा निकाल होईल. 70 टक्के लोकप्रतिनिधी शिंदे गटाकडे आहेत. त्यामुळे खरी शिवसेना कोणती हे सिद्ध झालं आहे त्यामुळे केविलवाणा प्रयत्न त्या शिवसेनेनं करू नये.
इतर महत्वाच्या बातम्या