Aaditya Thackeray in Kolhapur : युवा सेनाप्रमुख आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी आज जयसिंगपूरमध्ये बंडखोर आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या मतदारसंघांमध्ये जाहीर सभा घेत कडाडून हल्ला चढवला. 40 बंडखोर तसेच 12 खासदारांवर त्यांनी घणाघाती हल्ला चढवला. गद्दारीचा डाग त्यांच्यावरील कधीही पुसला जाणार नाही असा प्रहार त्यांनी केला. 


हिंमत असेल तर त्यांनी आमदार आणि खासदारकीचा राजीनामा द्यावा आणि पुन्हा निवडणुकीला सामोरे जावे, असे आव्हान त्यांनी यावेळी बोलताना दिले. या लोकांना मी प्रेमाने मिठी मारली, पण त्यांच्या हातामध्ये खंजीर होता,  तो खंजीर त्यांनी पाठीत खुपसल्याचे आदित्य ठाकरे म्हणाले. यावेळी त्यांनी बंडखोर खासदार धैर्यशील  माने यांचा उल्लेख करत चांगलाच हल्ला चढवला. ते म्हणाले की, धैर्यशील माने यांनी जिथे बोट दाखवलं त्या ठिकाणी निधी दिला. 


हिंमत असेल, तर राजीनामा द्या 


आदित्य ठाकरे यांनी बंडखोरांचा समाचार घेताना गद्दार असाच वारंवार उल्लेख केला. यांना कडाडून मिठी मारली, प्रेम दिलं, पण त्यांच्या हातात खंजीर होता.यांना कोणत्या गोष्टीची कमी केली ज्यामुळे यांनी गद्दारी केली असेल ? अशी विचारणा त्यांनी प्रेक्षकांना केली.यांच्यामध्ये हिंमत असेल, तर यांनी राजीनामा देऊन पुन्हा निवडणुकीसाठी सामोरे जावे, असे आव्हान त्यांनी यावेळी दिले. या लोकांनी माणुसकीसोबत गद्दारी केल्याचे ते म्हणाले. 


जे गद्दार आमचे झाले नाही,ते तुमचे तरी होणार का?


ते पुढे म्हणाले की, जे गद्दार आमचे झाले नाही,ते तुमचे तरी होणार का? तुम्ही सत्तेसोबत राहणार की सत्यासोबत असा सवालही आदित्य यांनी शिवसैनिकांना केला. बंडखोर आमदारांवर टीका करताना आदित्य ठाकरे म्हणाले की,यांची गद्दारी आमच्या कानावर येत होती. मात्र,शपथ घेऊन हे आम्ही गद्दारी करणार नसल्याचे म्हणत होते.  मात्र, शेवटी त्यांनी जे करायचं तेच केलं.परंतु,राजकारणात चांगल्या लोकांना स्थान असतं हे सिद्ध करायचं आहे म्हणून मी बाहेर पडलो आहे. 



इतर महत्वाच्या बातम्या