कोल्हापूर : पश्चिम महाराष्ट्रातील 58 पैकी 45 हून अधिक जागा आम्ही जिंकणार आहोत. महाविकास आघाडी पश्चिम महाराष्ट्रात सगळ्यात स्ट्रॉंग दिसेल, अशी प्रतिक्रिया कोल्हापूर काँग्रेस जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील यांनी दिली आहे. सतेज पाटील यांनी पश्चिम महाराष्ट्रात महाविकाश आघाडी सर्वाधिक जागा जिंकणार असल्याचे सांगत फडणवीस यांच्या दाव्यावर प्रत्युत्तर दिले. 


मोठा भाऊ किंवा कोणता भाऊ छोटा असा विषय नाही


सतेज पाटील म्हणाले की, महाविकास आघाडी हा राज्याचा मोठा भाऊ म्हणून निवडणुकीत उतरणार आहे. कोणता पक्ष मोठा भाऊ किंवा कोणता भाऊ छोटा असा विषय नसल्याचे सतेज पाटील म्हणाले. थोड्याच दिवसात आमच्या सर्व जागा घोषित केल्या जातील. निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या की 24 तासात देखील उमेदवार जाहीर होतात. 






मुख्यमंत्रीपद हा आमचा वादाचा मुद्दा नाही 


सतेज पाटील यांनी काँग्रेस आणि ठाकरे गटामध्ये मुख्यमंत्रिपदावरून वाद सुरु आहे का? काँग्रेस मुख्यमंत्रिपदासाठी प्रयत्न करत आहे का? असे विचारण्यात आलं असता त्यांनी मुख्यमंत्रीपद हा आमचा वादाचा मुद्दा नाही, निकाल लागल्यावर योग्य निर्णय घेतील, असे सांगितले. सगळ्या बाबतीत हे सरकार फेल गेलं आहे, शाश्वत सरकार आम्ही देऊ, असे ते म्हणाले. 


70 टक्के आमदार महायुतीसाठी पश्चिम महाराष्ट्र देऊ शकतो


दुसरीकडे, कोल्हापुरातील कसबा बावड्यातील महासैनिक दरबार हाॅलमध्ये भाजप पदाधिकाऱ्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत हा मेळावा झाला. या मेळाव्यात बोलताना फडणवीस यांनी महाविकास आघाडीवर तोफ डागली होती. ते म्हणाले की, आज पश्चिम महाराष्ट्रात भाजप हाच सर्वात मोठा पक्ष आहे. आपण जर ठरवलं तर 70 टक्के आमदार महायुतीसाठी पश्चिम महाराष्ट्र देऊ शकतो. आपण आत्मविश्वासाने उभे राहिलो तर कोल्हापुरातील या आधीचे सर्व रेकॉर्ड आपण मोडू शकतो. पश्चिम महाराष्ट्र हा भारतीय जनता पक्षाचा गड आहे हे आपण दाखवून देऊ शकतो. लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टीला हरवण्यासाठी जाती धर्माचा आधार घेतला गेला, पण जे झालं नाही त्याचा फारसा विचार करू नका, आता आरे ला कारे केल्याशिवाय आपण फेक नरेटिव्हला उत्तर देऊ शकत नाही, असा सल्ला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला. 


इतर महत्वाच्या बातम्या