Kolhapur Direct Pipeline: बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित आणि कोल्हापूरचे (Kolhapur News) दीर्घकाळ स्वप्न असेल्या थेट पाईपलाईन योजनेमधील (Kolhapur Direct Pipeline) मैलाचा टप्पा पार झाला आहे. गेल्या 24 तासांमध्ये धरण पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या दमदार पावसामुळे काळम्मावाडी धरणाच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. त्यामुळे कोल्हापूर शहराच्या थेट पाईलपाईलन योजनेच्या जॅकवेलमध्ये पाणी पोहोचले आहे. त्यामुळे या योजनेचा एक महत्त्वाचा टप्पा पूर्ण झाला आहे. या पाईपलाईनसाठी पाठपुरावा करत असलेल्या आमदार सतेज पाटील यांनी पाणी जॅकवेलपर्यंत पोहोचल्याची माहिती दिली आहे. 


सतेज पाटील (Satej Patil on Kolhapur Direct Pipeline) यांनी म्हटले आहे की, स्वप्नपूर्तीचा क्षण. संततधार पावसामुळे काळम्मावाडी धरणातून कोल्हापूर शहराला थेटपाईपलाईनद्वारे पाणीपुरवठा करणाऱ्या जॅकवेलपर्यंत पाणी पोहोचले आहे. आपल्या स्वप्नांना निसर्गाचीही साथ लाभत आहे. एक वेगळेच आत्मिक समाधान आज मनात आहे.


आता पंपिंग यंत्रणेच्या माध्यमातून पाणी उपसले जाईल


थेट पाईपलाईन योजनेतील महत्वाचा टप्पा असलेल्या जॅकवेलचे काम पूर्ण झाल्यानंतर पाण्याची प्रतीक्षा होती. मात्र, धरणातील पाण्याने यंदा तळ गाठल्याने कोल्हापूरकरांच्या मनात हुरहूर सुरु होती. काळम्मावाडी धरणातील पाणीपातळी थेट पाईपलाईन योजनेच्या इंटेक विहिरीच्या पातळीपेक्षाही अधिक खालावली होती. जवळपास तीन मीटरने पातळी खाली गेली होती. धरणात 609 मीटरवर पाणीपातळी गेल्यानंतर जॅकवेलमध्ये पाणी येण्यास सुरुवात होणार होती. आज सकाळी धरणाची पाणीपातळी 613.49 मीटरवर पोहोचल्याने मोठा टप्पा पार पडला आहे. त्यामुळे इंटेक विहिरीतून जॅकवेलमध्ये पाणी पोहोचले. जॅकवेलमध्ये पाणी आल्याने आता पंपिंग यंत्रणेच्या माध्यमातून पाणी उपसले जाईल. उपसलेले पाणी पुईखडीपर्यंत आणण्यासाठी पाईपलाईन टाकून पूर्ण झाली आहे. शुद्धीकरण प्रकल्पही पूर्ण झाला आहे.


वीजवाहिन्यांचे कामही युद्धपातळीवर सुरू


दुसरीकडे पुईखडीपर्यंतची पाईपलाईन टाकून पूर्ण झाली आहे. त्यातील काही जोड स्थानिकांच्या विविध मागण्यांमुळे पूर्ण झाले नव्हते. त्यात हळदी, अर्जुनवाडा गावांतील कामाचा समावेश होता. कोल्हापूर मनपाचे जलअभियंता नेत्रदीप सरनोबत यांनी ग्रामस्थांशी चर्चा करून तोडगा काढला आहे. दोन जोड पूर्ण झाल्यानंतर पाईपलाईनचे काम पूर्ण होईल. दुसऱ्या बाजूने वीजवाहिन्यांचे कामही युद्धपातळीवर सुरू आहे. तर जॅकवेलवरीलपंप हाऊसचे काम पूर्णत्वाला जात आहे. उपसा पंप जोडण्यासाठी तयारी सुरू आहे.


इतर महत्वाच्या बातम्या