कोल्हापूर : कोल्हापूरचे खासदार शाहू छत्रपती महाराज (Shahu Chattrapati), आमदार सतेज पाटील (Satej Patil) हे विशाळगडाच्या (Vishalgad Encroachment) दिशेनं रवाना झाले होते. यावेळी त्यांना प्रशासनानं पांढरेपाणी येथे रोखलं. जमावबंदी लागू असल्यानं शाहू छत्रपती यांना रोखण्यात आल्याची माहिती आहे. पोलिसांनी यावेळी पत्रकारांची देखील अडवणूक केली. पत्रकारांवर काठी उगारली असल्याची माहिती आहे. सतेज पाटील यांनी किमान 15 लोकांना विशाळगडावर जाऊ देण्याची मागणी केली आहे.
कोल्हापूरचे खासदार शाहू छत्रपती यांनी काल विशाळगडाची पाहणी करणार असल्याचं सांगितलं होतं. त्याप्रमाणं शाहू महाराज विशाळगडाच्या परिसराची करण्यासाठी रवाना झाले होते. मात्र, पोलिसांनी त्यांना पांढरेपाणी येथे रोखलं. आमदार सतेज पाटील यांनी ज्यांची घरं पेटवली,वाहनांचं नुकसान झालं त्याची पाहणी करण्यासाठी जाणाऱ्यांना रोखताय. ज्यांनी नुकसान केलं त्यांना काहीच करत नाही, असं सतेज पाटील म्हणाले. शांतता प्रस्थापित करायला जात आहोत. शिधा आणला आहे, ज्यांची घरं पेटवली आहेत त्यांना मदत करायला सर्वपक्षीय लोक जात आहोत. आम्हाला केवळ 15 लोकांना तिथं जाऊद्यात, असं सतेज पाटील म्हणाले. 15 लोकांना सोडायची लोकशाहीत परवानगी नाही का असा सवाल सतेज पाटील यांनी केला.
घटनेपूर्वी आम्ही जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस प्रमुखांना सूचना दिल्या होत्या. हिंसाचाराबाबत संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी खासदार शाहू छत्रपती यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली होती.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी शाहू महाराजांना विशाळगडकडे जाण्यापासून अडवणूक केली जाते ही दुर्दैवाची बाब आहे, असं म्हटलं.
ज्या शाहूंनी देशाला समता शिकवली त्यांच्या वारसाला अडवलं हा महाराष्ट्राचा अपमान आहे. ज्यांना अडवायला पाहिजे होत त्यांना अडवलं नाही. हा सरकारचा प्लॅन आहे, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले. काल पाठवलेले धारकरी होते, त्यांना कोणी पाठवलं हे मला सांगायला लावू नका, असंही जितेंद्र आव्हाड म्हणाले.
संबंधित बातम्या :