Rankala lake Kolhapur : कोल्हापूर शहराचा ऐतिहासिक वारसा आणि वैभव असणारा रंकाळा (Rankala Lake kolhapur) तलावाला अवकळा प्राप्त झाली आहे. पडत चाललेल्या संरक्षक भिंती, तलाव्यात मिसळणारे सांडपाणी यामुळे रंकाळा अस्तित्वाशी संघर्ष करत आहे. या पार्श्वभूमीवर शनिवारी विविध संघटनांनी बैठक बोलावली होती. या बैठकीत प्रदुषण रोखण्यासाठी तसेच संवर्धन करण्याची मागणी एकमुखाने करण्यात आली. रंकाळा तलावाच्या संवर्धनासाठी आवश्यक असलेल्या उपाययोजना, संरक्षक भिंतीची पडझड आदींबाबत चर्चा करण्यासाठी कोल्हापुरातील विविध सामाजिक संघटनांनी शनिवारी सायंकाळी जाहीर सभा बोलावली. या बैठकीला पर्यावरण व पक्षी तज्ज्ञ, प्रहार प्रतिष्ठान, रंकाळा संवर्धन समिती, रंकाळा परिसर पर्यावरण समिती व परिसरातील इतर संस्था उपस्थित होत्या.


सभेला संबोधित करताना पर्यावरण कार्यकर्ते उदय गायकवाड म्हणाले की, कोल्हापूर महापालिकेने संध्यामठ आणि रंकाळा टॉवरचे ((Rankala Lake kolhapur) संवर्धन करावे अशी आमची इच्छा आहे, ज्या तलावाच्या वारसा वास्तू आहेत. केवळ सुशोभीकरणाची कामे करणे म्हणजे संवर्धन नाही. कोल्हापूर महापालिकेनं संध्यामठ आणि रंकाळा टॉवरचे संवर्धन करावे. राज्य सरकारने दिलेल्या 12 कोटी रुपयांच्या निधीतून तलावाच्या सुशोभिकरणाची कामे हाती घेतली आहेत. सुशोभीकरणाऐवजी तलावाच्या सभोवतालचे नैसर्गिक सौंदर्य जपण्यासाठी पावले उचलावीत.


दरम्यान, पर्यावरण तज्ज्ञ सुहास वायंगणकर म्हणाले, गेल्या काही महिन्यांत स्थलांतरित पक्ष्यांची संख्या वर्षानुवर्षे कमी होत असल्याचे निदर्शनास आले आहे. सुशोभीकरणाच्या कामावर निधीची उधळपट्टी करणे चुकीचे आहे. रंकाळा तलावात पक्षी निरीक्षणाची सुविधा निर्माण करण्यात आली आहे, परंतु त्याबद्दल कोणालाही माहिती नाही.


Rankala Lake kolhapur : छोटे कासव व माशांचा मृत्यू


दरम्यान, कोल्हापूर शहराचे वैभव ऐतिहासिक रंकाळा सध्या मरणयातना सहन करत आहे. एका बाजूने रंकाळ्याच्या संरक्षक कोसळून पडत असतानाच दुसऱ्या बाजूने रंकाळ्याचे प्रदुषणही वाढत चालले आहे. प्रदुषणाचा स्तर वाढल्याने संध्यामठजवळ 19 सप्टेबर रोजी छोटे कासव तसेच मासे मेल्याचे निदर्शनास आले होते. 


Rankala Lake kolhapur : संरक्षक भिंतींना अनेक ठिकाणी तडे 


रंकाळ्याच्या संरक्षक भिंतींनाही अनेक ठिकाणी तडे गेले आहेत, तर काही ठिकाणी  कोसळल्या आहेत. पदपथ ठिकाणाची भिंत दोन ठिकाणी कोसळली आहे. मागील महिन्यात रंकाळा तलावाच्या संरक्षक भिंतीचा काही भाग कोसळला होता. साधारण आठ ते दहा वर्षांपूर्वी संपूर्ण रंकाळ्यात दुषित पाणी येऊन मिसळल्याने केंदाळाचे साम्राज्य होते. त्यामुळे हे केंदाळ बाहेर काढण्यासाठी भिंत पाडून कार्यवाही करण्यात आली होती. त्यानंतर केंदाळ काढण्याची प्रक्रिया पार पाडल्यानंतर ही भिंत बांधण्यात आली होती.  मात्र, सुमार दर्जाच्या बांधकामामुळे ही भिंत काही वर्षांमध्ये ढासळली गेली. शालिनी पॅलेस समोरील भिंतही कोसळली आहे. त्यामुळे जागोजागी भिंतीला तडे जाऊन कोसळली आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या