इचलकरंजी (जि. कोल्हापूर) : सुरतचे दोघे महाराष्ट्र लुटत आहेत, महाराष्ट्राचा आकस महाराष्ट्र स्थापनेवेळी दिसला, मोरारजी देसाई यांनी मराठी माणसांना मारण्याचा आदेश दिला होती. आताही सुरतेचे दोन जण महाराष्ट्र लुटत आहेत, पण या लुटारुंचा सुफडासाफ केल्याशिवाय शांत बसणार नाही, यांना नेस्तनाबूत केल्याशिवाय राहणार नसल्याचा निर्धार उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला. इचलकरंजीमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यजित पाटील यांच्या प्रचारार्थ उद्धव ठाकरे बोलत होते. या सभेला शरद पवार यांनीही मागदर्शन करताना मोदींवर हल्लाबोल केला.
भाजपच्या व्हायरसपासून दूर रहा
त्यांनी सांगितले की, सत्तेत आल्यानंतर शेती अवजारे यांच्यावरील जीएसटी माफ करणार आहोत. जे शेतकऱ्यांना दिल्लीत येऊ देत नाहीत त्यांना दिल्लीत येऊ द्यायचं नाही, असा निर्धार करण्याचे आवाहन केले. ते पुढे म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान हे मानायला तयार नाही. दलित व्यक्तीने लिहिलेलं संविधान मी कसं मानू हा आकस त्यांना आहे. मोदींची तुमच्या गुजरातमध्ये भटकता आत्मा शोधा, महाराष्ट्रात शोधू नका. भवानी मातेबद्दलचा आकस मला धाराशिवमध्ये पाहायला मिळाला हा आकस गाडून टाकायचा आहे, आमच्या मशालीला हात घालू नका नाही, तर भस्मसात व्हाल, कोरोना काळात सांगत होतो या व्हायरसपासून दूर रहा, आज सांगतो भाजपच्या व्हायरसपासून दूर रहा असे आवाहन त्यांनी केले.
वाटलं नावाप्रमाणे असेल, पण धैर्य हरणारा माणूस पाहिला नाही
उद्धव ठाकरे म्हणाले की, त्याला (धैर्यशील माने) निवडून देण्यासाठी मी मते मागितली होती यासाठी मी माफी मागतो. वाटलं नावाप्रमाणे असेल, पण धैर्य हरणारा माणूस पाहिला नाही. याने, तर डबल गद्दारी केली. गद्दारांचे दोन बापही महाराष्ट्राचे गद्दार आहेत. मोदींनी महाराष्ट्राशी द्रोह केला, गद्दारी केली. ते पुढे म्हणाले की, मोदी सरकार बदलत आहे हे आता जगभर झालं आहे. हे मोदी सरकार नाही गजनी सरकार आहे. काल काय बोलले ते आज आठवत नाही, काय आश्वासन दिली ते कळत नाही. फुटबॉल सामन्यात होतं तसं मोदी दररोज सेल्फ गोल मारतात. मोदीजी गाय पे चर्चा करता, जरा महागाईवर पण बोला असा टोलाही त्यांनी लगावला.
इतर महत्वाच्या बातम्या