कोल्हापूर : राज्यसभेची उमेदवारी देत असताना त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी संभाजीराजे यांचा आवमान केला, तेच उद्धव ठाकरे आता छत्रपती घराण्याविषयी पुळका दाखवत असल्याची टीका शिंदे गटाचे नेते मंत्री उदय सामंत यांनी केली. उदय सामंत यांनी आज कोल्हापुरात बोलताना कशा पद्धतीने राज्यसभा निवडणुकीत संभाजीराजे यांच्या माघारीवरून घडामोडी घडल्या हे सांगण्याचा प्रयत्न केला. 


उदय सामंत म्हणाले की, त्यांचं (उद्धव ठाकरे) छत्रपती घराण्याविषयी असलेलं प्रेम हे बेगडी प्रेम आहे. कोल्हापूरची जनता हे सहन करणार नाही. माझी प्रामाणिक इच्छा होती की संभाजीराजे हे राज्यसभेवर खासदार म्हणून जावेत. मात्र, मला चर्चा करण्यामध्ये गुंतवून ठेवलं आणि संजय पवार यांना उमेदवारी दिली. याबद्दल मी संभाजीराजे यांच्याकडे दिलगिरी देखील व्यक्त केली आहे. आता छत्रपती घराण्याविषयी जे प्रेम दाखवत आहेत ते खरं प्रेम नाही असंही उदय सामंत म्हणाले.  


राज्यसभेच्या सगळ्या घडामोडीतील मंत्री मीच होतो


सामंत यांनी राजकारणात कशा पद्धतीने रंग बदलले जातात असे म्हणत दोन व्हिडिओ दाखवले. राज्यसभेच्या सगळ्या घडामोडीतील मंत्री मीच होतो, असे सांगत ते म्हणाले की, संभाजीराजे ग्रामपंचायतीपासून लोकसभेपर्यंत शिवसेनेचा (एकसंध शिवसेना फुटण्यापूर्वी) प्रचार करतील. केवळ शिवसेनेचा आदेश मानला पाहिजे. संभाजीराजे यांनी केवळ आणि केवळ शिवसेनेची भूमिका मांडली पाहिजे. संभाजीराजे यांनी प्रेस घेऊन सांगितलं पाहिजे की शिवसेना नेते माझे नेते आहेत.


मात्र, यामध्ये संभाजीराजे यांनी काही बदल करायला सांगितले की मी छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार सांगेन. शिवाय गडकोट किल्ल्यांच्या संवर्धनासाठी काम करेन असं संभाजीराजे म्हणाले. जर मला उमेदवारी द्यायची असेल, तर कोल्हापूरला येऊन द्या, असं संभाजीराजे म्हणाले आणि बैठकीतून उठले. शेवटीच्या बैठकीत अचानक सांगितले की, संभाजीराजे यांना शिवसेनेत प्रवेश केला पाहिजे. हा मला आणि संभाजीराजे यांना सुद्धा धक्का होता. त्यामुळे सरड्यासारखे रंग बदलणारे आता छत्रपती घरण्याबद्दल पुळका दाखवत आहेत. तेव्हा संभाजीराजे यांना का खेळवून का ठेवले? याचं उत्तर दिलं पाहिजे, ज्यांनी संभाजीराजे यांचा अपमान केला त्यांनी छत्रपती घराण्याबद्दलचा आदर शिकवू नये, असेही ते म्हणाले. 


इतर महत्वाच्या बातम्या