Kolhapur News : दसरा-दिवाळीला अंबाबाई मंदिर परिसरातील वाहतूक सुरू राहणार आहे. याबाबतचा निर्णय व्यापाऱ्यांच्या प्रशासनासोबत आज झालेल्या बैठकीत घेण्यात आला. सणांच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाच्या वतीने अंबाबाई मंदिर रोड परिसरात बॅरिकेटिंग लावून सर्व रस्ते वाहतुकीसाठी बंद केले जातात. परिणामी परिसरातील सर्वच व्यापाऱ्यांच्या व्यवसायावर परिणाम होत होता. परिणामी यावर मार्ग काढण्यासाठी प्रशासन, कोल्हापूर सराफ व्यापारी संघ व महाद्वार रोड व्यापारी असोसिएशनचे पदाधिकाऱ्यांमध्ये गेल्या तीन दिवसांपासून बैठकांचे आयोजन केले होते.


आज सराफ व्यापारी संघाच्या कार्यालयात जिल्हा पोलिसप्रमुख शैलेश बलकवडे, करवीर तहसीलदार शीतल भांबरे-मुळे, शहर पोलिस उपाधीक्षक मंगेश चव्हाण, वरिष्ठ पोलिस निरीक्षक तानाजी सावंत, वाहतूकच्या स्नेहा गिरी, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, उपशहर अभियंता नारायण भोसले, अतिक्रमण विभागप्रमुख सचिन जाधव यांच्या उपस्थितीत बैठक झाली.


कोल्हापूर सराफ व्यापारी संघाचे अध्यक्ष राजेश राठोड यांनी यावेळी सांगितले की, बॅरिकेटिंगमुक्त महाद्वार रोड केल्यास सर्वच व्यावसायिकांचा व्यवसाय होईल. माजी नगरसेवक किरण नकाते म्हणाले, प्रशासनाने नेहमीच व्यापाऱ्यांना सहकार्य केले आहे. यावेळीही सहकार्य करून सर्वांना व्यापार होण्यास प्रशासनाने मदत करावी. यासाठी मंत्री चंद्रकांत पाटील, खासदार धनंजय महाडिक, जिल्हाधिकारी, पोलिस प्रमुख, जुना राजवाडा निरीक्षक, अशा सर्वांना निवेदन देऊन व्यवसायावर होणाऱ्या परिणामांची जाणीव करून दिली आहे. त्यावेळीही सर्वांनी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले होते.


सर्वांच्या सूचना आणि मते ऐकून घेतल्यानंतर प्रशासनाने दसरा-दिवाळीमध्ये महाद्वार रोड परिसरातील रस्ते खुले करण्यास परवानगी दिली. भाऊसिंगजी रोड, गुजरी ते रंकाळा रोड, महाद्वार रोड (बिनखांबी गणेश मंदिर ते पापाची तिकटी) ताराबाई रोड, जोतिबा रोड, राजोपाध्ये बोळ, बाबूजमाल रोड (अंबाबाई मंदिर परिसर) या परिसरामध्ये दुचाकी व रिक्षाला परवानगी असेल. त्याचबरोबर व्यापाऱ्यांच्या मालाची ने-आण करण्यासाठी रात्री दहा ते सकाळी सहापर्यंत करता येईल, असेही ठरवण्यात आले.


यावेळी सराफ संघाचे उपाध्यक्ष विजय हावळ, सचिव प्रीतम ओसवाल, तेजस धडाम, संचालक शिवाजी पाटील, अशोक ओसवाल, विजयकुमार भोसले, कुलदीप गायकवाड, कुमार ओसवाल, माजी नगरसेवक अजित ठाणेकर, महाद्वार व्यापारी असोसिएशनचे जयंत गोयानी, मनोज बहिरशेट, सत्यजित सांगावकर, अमित केसवाणी, दीपक बागल यांच्यासह मोठया संख्येने व्यापारी उपस्थित होते.


इतर महत्वाच्या बातम्या