Heavy Rain in Maharashtra : संपूर्ण राज्यासह कोल्हापूर शहर आणि जिल्ह्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून परतीच्या पावसाने हाहाकार केला आहे. या पावसाने कोल्हापूर जिल्ह्यातील पिकांची नासाडी झाली आहे. वीज कोसळण्याच्या घटनांमध्येही सातत्याने वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर शिवाजी विद्यापीठाचे प्राध्यापक डॉ. सचिन पन्हाळकर यांच्याशी एबीपी माझाने संवाद साधला. पन्हाळकर यांनी परतीचा लांबलेला पाऊस तसेच वारंवार होत असलेल्या ढगफुटीसदृश्य पावसाची कारणे विषद केली. तसेच येत्या सात ते आठ दिवसात परतीचा पाऊस थांबेल, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली. 


समुद्राचे वाढलेलं तापमान, कमी दाबाच्या पट्टा निर्माण होण्याने तसेच ला निना असेल आदी कारणाने परतीचा पाऊस हाहाकार करत असल्याचे ते म्हणाले. ते पुढे म्हणाले, ग्रामीण भागाच्या तुलनेत शहरी भागात बांधकामे जास्त झाली आहेत. त्यामुळे तापमान सुद्धा जास्त असते, त्यामुळे त्या ठिकाणी कमी दाबाचा पट्टे तयार होतात. तसेच आजूबाजूने वाहणारे वारे हे शहरी भागाच्या दिशेने वाहताना दिसून येतात. वातावरणातील बदलही दिसून येतात. त्याचाही परिणाम स्थानिक पातळीवर होताना दिसतो. 



पन्हाळकर म्हणाले, इतर समुद्रांच्या तुलनेत हिंदी महासागराचे तापमान एक अंश सेल्सिअसने वाढलं आहे. तसेच इंडियन ओसियन डायपोल (indian ocean dipole) ही एक संकल्पना आहे. यामध्ये आपण जर अरबी समुद्राचे तापमान जास्त असेल, तर आपण इंडियन ओसिशन  पाॅझिटिव्ह डायपोल असे म्हणतो, आणि बंगालच्या उपसागराचे जास्त असल्यास निगेटीव्ह डायपोल असे म्हणतो. यावर्षी अरबुी सुमुद्राचे वातावरण वाढलं आहे, त्यामुळे पावसाचे प्रमाण वाढलं आहे.   


राज्यात 123 टक्के पाऊस, सरासरीच्या 23 टक्के पाऊस जास्त 


सचिन पन्हाळकर यांनी राज्यात आतापर्यत 123 टक्के पाऊस झाल्याचे सांगितले. सरासरीच्या तब्बल 23 टक्के पाऊस जास्त झाला आहे. ते पुढे म्हणाले, गेल्या 50 ते 60 वर्षात बंगालच्या उपसागरात जास्त वादळे निर्माण होत होती, पण गेल्या काही वर्षांपासून अरबी समुद्रात वादळाचे प्रमाण वाढलं आहे. तसेच कमी दाबाचा पट्टा निर्माण होण्याचे परिणाम सुद्धा वाढले आहेत. त्यामुळे राज्यासह किनारपट्टीच्या राज्यांमध्ये पावसाचे प्रमाण जास्त वाढल्याचे दिसून येत आहे.


ला निना अस्तित्व सुद्धा दिसून येत आहे


ला 'निना'चे अस्तित्वानेही राज्यात परतीचा पाऊस अजून थांबलेला दिसून येत असल्याचे त्यांनी सांगितले. त्याचबरोबर अरबी समुद्रामध्ये वाढलेल्या वादळांनी सुद्धा परतीचा पाऊस वाढत चालला आहे. 


ला निना म्हणजे काय?


जेव्हा प्रशांत महासागराच्या पूर्वेकडील भागातील पाण्याचे तापमान थंड होते, तेव्हा पश्चिमेकडील भागातील हवेचा दाब कमी होतो. तेव्हा प्रशांत महासागराच्या पश्चिमेकडील भागाकडे वारे पाण्याची वाफ ढगांच्या स्वरूपात वाहून आणतात आणि त्यातून पश्चिमेकडील भागात अतिवृष्टी होते. त्यालाच ला निना असे संबोधले जाते.


ढगफुटी वातावरणातील बदलाने 


ढगफुटीसदृश्य पावसाच्या घटनांचा संदर्भ पन्हाळकर यांनी वातावरण बदलाशी जोडला. याबाबत माहिती देताना त्यांनी संगितले की, पावसाचे दिवस कमी होत चालले आहेत. म्हणजेच जुनपासून ऑक्टोबरपर्यंत पाऊस पडत होता त्यामध्ये बदल झाला आहे. कमी कालावधीमध्ये जास्त पाऊस पडत आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या