कोल्हापूर : जिल्ह्यात रविवारी सायंकाळपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसाचा जोर सोमवारी पहाटेपर्यंत कायम राहिला. धरण क्षेत्रातील मुसळधार पावसामुळे राधानगरी धरणाचे सातही स्वयंचलित दरवाजे सोमवारी पहाटे एकामागोमाग एक उघडण्यात आले. यंदाच्या पावसाळ्यात प्रथमच हे सातही दरवाजे उघडले गेले असून पंचगंगेच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ झाली आहे.

Continues below advertisement

धरणातील पाणलोट वाढला

राधानगरी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात प्रचंड पाऊस झाल्याने धरणातील पाणीसाठा वेगाने वाढला. पहाटे 4.13 वाजेपर्यंत दोन ते सात क्रमांकाचे सहा दरवाजे खुले झाले होते. त्यानंतर 4.20 वाजता पहिला दरवाजा उघडण्यात आला. परिणामी सातही दरवाजांतून पाण्याचा विसर्ग सुरू झाला. सध्या धरणातून 10 हजार क्युसेक पाणी सोडण्यात येत असून वीजगृहासाठी आणखी 1 हजार 500 क्युसेक पाणी वापरले जात आहे. अशा प्रकारे एकूण 11 हजार 500 क्युसेक पाणी भोगावती नदीपात्रात सोडले जात आहे.

पंचगंगेची पातळी पात्राबाहेर

या विसर्गामुळे पंचगंगेची पाणीपातळी झपाट्याने वाढून ती पाचव्यांदा पात्राबाहेर गेली आहे. रात्री 11 वाजता पाणीपातळी 32.10 फूटांवर पोहोचली होती. नदीकाठच्या गावांमध्ये प्रशासनाने सतर्कता वाढवली आहे.

Continues below advertisement

कोल्हापूर-रत्नागिरी महामार्ग ठप्प

पावसाचा तडाखा वाहतुकीलाही बसला. कोल्हापूर-रत्नागिरी महामार्गावरील आंबाघाटात सुरू असलेल्या कामाच्या ठिकाणी मातीचा भराव कोसळल्याने वाहतूक तब्बल पाच तास ठप्प राहिली. या दरम्यान वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागला.

चांदोली धरणातून वारणा नदीतील विसर्ग रात्रीपासून वाढवला चांदोली धरणातून वारणा नदीत करण्यात येणारा विसर्ग रात्रीपासून वाढवण्यात आला आहे. रात्रीपासून एकूण 18,630 क्युसेक विसर्ग वारणा नदीपात्रात सोडण्यास सुरुवात झाली आहे, चांदोली धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये होत असलेल्या अतिवृष्टीमुळे आणि धरण भरत आल्याने वारणा नदीत विसर्ग वाढवला गेला. चांदोली धरण व्यवस्थापनाकडून वारणा नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा

राज्यात शाळांना सुट्टी

मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर मुंबई, ठाणे, पालघर, नवी मुंबई, रायगड, मीरा-भाईंदर, पनवेल आणि रत्नागिरीतील शाळांना आज सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. दोन दिवसांपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे मुंबईतील सखल भाग पाण्याखाली गेला. रस्ते वाहतुकीवर परिणाम झाला असून रेल्वे ट्रॅकवर पाणी साचल्याने लोकल वाहतुकीलाही अडथळा निर्माण झाला आहे.

कोकण व घाटमाथ्यावर रेड अलर्ट

कोकण आणि घाटमाथ्यावर वरुणराजाची ‘कृपादृष्टी’ कायम आहे. मुंबई, ठाणे, रायगड, पालघर या भागात रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. पुणे, सातारा, नाशिक घाट परिसरातही पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे.

कधी कुठे कोणता अलर्ट

* 19 ऑगस्ट: पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, नाशिक घाट, पुणे घाट, सातारा घाट – ऑरेंज अलर्ट  सिंधुदुर्ग, कोल्हापूर घाट, गडचिरोली – ऑरेंज अलर्ट  * धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, अहमदनगर, पुणे शहर, कोल्हापूर, गडचिरोली, मराठवाडा व विदर्भातील बहुतांश जिल्हे – यलो अलर्ट

* 20 ऑगस्ट : पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, नाशिक घाट, पुणे घाट, कोल्हापूर घाट, सातारा घाट – *रेड अलर्ट*  सिंधुदुर्ग, धुळे, नंदुरबार, नाशिक, मराठवाडा व विदर्भ – यलो अलर्ट

* 21 ऑगस्ट : पुणे घाट – रेड अलर्ट  पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, नाशिक घाट, सातारा घाट, पुणे शहर, सातारा शहर – *यलो अलर्ट*

* 22 ऑगस्ट : पुणे घाटमाथा – यलो अलर्ट

प्रशासनाचे आवाहन

नागरिकांनी सतर्क राहावे, नदीकाठच्या भागातील नागरिकांना सावधानतेचा इशारा दिला असून हवामान विभागाच्या सूचना पाळाव्यात, असे प्रशासनाने आवाहन केले आहे.