Continues below advertisement


कोल्हापूर : सर्किट बेंचच्या कामकाजाच्या पहिल्याच दिवशी गोकुळ दूध संघाविरोधात याचिका दाखल करण्यात आली आहे. गोकुळचे संचालक मंडळ बरखास्त करून नुकसानीच्या वसुलीबाबत ही याचिका दाखल करण्यात आली आहे. कोल्हापूर सर्किट बेंचने ही याचिका स्वीकारली आहे. गोकुळ दूध संघात मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप याचिकाकर्ते प्रकाश बेलवाडे यांनी केला आहे. सर्किट बेंच सुरू झालेल्या पहिल्याच दिवशी 120 केसेस बोर्डवर आल्या.


याचिकाकर्ते प्रकाश बेलवाडे हे आजरा तालुक्यातील महादेव सहकारी दूध संस्थेचे संचालक आहेत. गोकुळच्या लेखापरीक्षणात अनेक त्रुटी आढळून आल्या असतानाही संचालकांनी जाणीवपूर्वक त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप या याचिकेतून करण्यात आला आहे. याबाबत मंगळवार, 26 ऑगस्टला सुनावणी होणार आहे.


पहिल्याच दिवशी 120 केसेस बोर्डवर


कोल्हापूरमध्ये मुंबई उच्च न्यायालयाच्या सर्किट बेंचचा सोमवारी पहिला दिवस होता. पहिल्याच दिवशी 120 केसेस बोर्डवर लागल्या आहेत. त्यामुळे पहिल्याच दिवशी वकील आणि पक्षकार यांची गर्दी पाहायला मिळाली. ज्यांची मुंबईला तारीख होती ते पक्षकार कोल्हापुरातच कोर्टात हजर झाल्याचं दिसून आलं.


42 वर्षांच्या लढ्याला यश


कोल्हापूरकरांच्या गेल्या 42 वर्षांच्या लढ्याला अखेर यश आलं आहे. कोल्हापुरातील सर्किट बेंचचं सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते उद्घाटन झालं. यामुळं कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या 6 जिल्ह्यांना मोठा दिलासा मिळाला.


मुंबई हायकोर्टातील प्रलंबित खटले आता या सर्किट बेंचमध्ये चालवले जाणार आहेत. सर्किट बेंच म्हणजे न्यायालयाचे एक तात्पुरतं ठिकाण. उच्च न्यायालयातील न्यायमूर्ती इथं सुनावणी घेतात. जवळपास 70 हजार खटले आता सर्किट बेंचमध्ये चालवले जाणार आहेत.


सर्किट बेंचचे कामकाज कसे चालेल?


सर्किट बेंच म्हणजे न्यायालयाचे एक तात्पुरते ठिकाण असते. उच्च न्यायालयातील न्यायमूर्ती येत प्रकरणे चालवतात. याची स्थापना करण्याचा अधिकार राज्याच्या उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तींना असतो आणि त्याची अधिसूचना राज्यपाल प्रसिद्ध करतात. खंडपीठ मात्र कायमस्वरूपी स्वरूपाचे असते. यासाठी घटनात्मक प्रक्रिया आवश्यक असते. 


कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये नागरी, फौजदारी, कामगार, मालमत्ता, सार्वजनिक हक्क अशा विविध प्रकारचे खटले चालतील. मात्र कंपनी ॲक्ट, करसंबंधी प्रकरणे आणि एनआयए न्यायालयाशी संबंधित खटले मुंबई उच्च न्यायालयामध्ये चालतील. मुंबई, नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर येथील न्यायमूर्ती तात्पुरत्या स्वरूपात कोल्हापूर येथे नियुक्त होऊन प्रकरणे चालवतील.


ही बातमी वाचा: