कोल्हापूर : कोल्हापूर शहरात साफसफाई करणे, कचरा उठाव करणे, कचरा प्रक्रियेवर नियंत्रण ठेवणे, कर्मचाऱ्यांमार्फत कचरा जाळणे, ॲटो टिप्पर नियोजनासाठी उपस्थित न राहिल्याने स्वच्छता विभागाकडील कामकाजामध्ये अक्षम्य निष्काळजीपणा केल्याने मुख्य आरोग्य निरिक्षक जयवंत पवार यांच्यासह अधीक्षक मारुती मधाळे, मुकादम आनंद बावडेकर यांना निलंबित करण्यात आलं आहे. ही कारवाई प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांनी केली. पवार यांना सेवेतून निलंबित करण्यात पदाचा कार्यभार पशुवैद्यकिय अधिकारी डॉ. विजय पाटील यांच्याकडे अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला आहे. जनसंपर्क अधिकारी मोहन सुर्यवंशी यांनाही तीन हजारांचा दंड करण्यात आला आहे. 


आयुक्तांंकडून जागेवर जात पाहणी


बुध्द गार्डनमध्ये प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांनी सकाळी सहा वाजता समक्ष पाहणी केली असता याठिकाणी मुख्य आरोग्य निरिक्षक जयवंत पवार हे उपस्थित नव्हते. तसेच सर्व ॲटो टिप्पर 6 वाजता गेटच्या बाहेर पडण्याची जबाबदारी मुख्य आरोग्य निरिक्षक जयवंत पवार, अधिक्षक मारुती मधाळे व आरोग्य निरिक्षक आनंदा बावडेकर यांचेवर असतानाही त्या बाहेर न पडलेने व स्वत: वर्कशॉपमध्ये उपस्थित नसलेने त्यांच्यावर आयुक्तांनी कारवाई केली. 


कचरा जाळण्याचा प्रकार सुरुच 


शहर समन्वयक हेमंत काशीद व मेघराज चडचणकर यांच्याकडे महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य स्वच्छता विभागाकडे शहर समन्वयक या अत्यंत महत्वाच्या व जबाबदारी दिली आहे. शहरातील दैनंदिन साफसफाई करीत असताना कार्यरत आरोग्य निरीक्षक, मुकादम, सफाई कामगार यांचेकडून सफाई केल्यानंतर कचरा जाळला जाण्याचे प्रकार वारंवार निदर्शनास येत आहेत. यापूर्वी अशा प्रकारे कचरा न जाळणे बाबत आदेश देऊनही तोच प्रकार सुरु आहे. 


शहर समन्वयक या नात्याने शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार सर्व सफाई कर्मचारी, मुकादम याना कचरा न जाळणं तसेच ओला व सुका कचरा याचे वर्गीकरण व इतर बाबी बाबत माहिती देत जागरुकता निर्माण करणे आवश्यक होते. शहर समन्वयक हेमंत काशीद व मेघराज चडचणकर यांना पाच हजारांचा दंड करण्यात आला आहे. वाय पी पोवार नगर ते जवाहरनगर मुख्य रस्ता, शाहू मित्रमंडळ येथील नार्वेकर मार्केटजवळ व माजी आमदार जयश्री जाधव यांच्या निवास स्थानाकडे जाणाऱ्या रस्तेकडेला कचऱ्याचे ढिग साचल्याचे निदर्शनास आल्याने आरोग्य निरीक्षक शर्वरी कांबळे यांना दीड हजार व मुकादम प्रफुल्ल आयवाळे, सागर बुचडे, संग्राम कांबळे यांना प्रत्येकी पाचशेचा दंड करण्यात आला. 


इतर महत्वाच्या बातम्या