Kolhapur : गर्भलिंग निदान प्रकरणी राज्यभर आरोग्य विभाग गांभीर्याने काम करत आहे. किंबहुना कारवाई देखील वाढलेली आहे. याप्रकरणी तक्रारदार महिलेला देखील एक लाख रुपयांची नुकसान भरपाई देण्याबाबतचा अध्यादेश देखील पुढील आठ दिवसात काढण्यात येणार आहे. तक्रारदार महिलेला सर्व सुविधा आणि खर्चाची तरतूद केलेली आहे. गर्भलिंग निदान प्रकरणात वारंवार एकच आरोपी सापडत असेल तर त्याच्यावर मोका अंतर्गत कारवाईचा विचार सुरू असल्याची मोठी घोषणा राज्याचे आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर (Prakash Abitkar) यांनी केली आहे.
दरम्यान, राज्यात एकीकडे गुलेन बॅरी सिंड्रोमचे (Guillain Barre Syndrome) रूग्ण दिवसेंदिवस वाढत असताना दररोज रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. तर आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या चंदगड येथे जीबीएसच्या आणखी एका रुग्णाचा मृत्यूने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी बोलताना प्रकाश आबिटकर म्हणाले की, गुलेन बॅरी सिंड्रोम हा आजार आटोक्यात आहे. या रोगातून बरं होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढली आहे, हे सत्य आहे. यातील 200 पैकी सहा ते सात लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे योग्य ती खबरदारी घेतली जात असल्याची माहिती ही प्रकाश आबिटकर यांनी दिली आहे.
पक्षात कोणी येऊ इच्छित असेल तर त्यांचं स्वागतच- प्रकाश आबिटकर
शक्तीपीठ महामार्गामध्ये आमच्या तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी जात आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचा या महामार्गाला विरोध आहे. शेतकऱ्यांची ही भावना मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना पोहोचवलेली आहे. असेही मंत्री प्रकाश आबिटकर म्हणाले. तर दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महायुतीचे सरकार आले आहे. त्यामुळे शिवसेनेत उत्साह असून जिल्ह्यातील पक्षात कोणी येऊ इच्छित असेल तर त्यांचं स्वागतच आहे. जिल्ह्यातील पक्षप्रवेशासंदर्भात योग्य लोकांमार्फत योग्य ती बोलणी सुरू आहे असेही ते म्हणाले.
गुलेन-बॅरे सिंड्रोमची लक्षणे-
- अचानक पायातील किंवा हातात येणारा अशक्तपणा / दुर्बलता / लकवा- अचानकपणे उद्भवलेला चालण्यातील त्रास किंवा अशक्तपणा- जास्त दिवसांचा अतिसार (डायरिया) आणि ताप
नागरिकांनी घ्यावयाची काळजी
- पिण्याचे पाणी उकळून प्यावे- स्वच्छ व ताजे अन्न खावे- शिजलेले अन्न आणि न शिजलेले कच्चे अन्न एकत्रित ठेऊ नये - वैयक्तिक स्वच्छतेवर भर द्यावा- हात किंवा पायांमध्ये अचानक वाढत जाणारा अशक्तपणा असल्यास त्वरित जवळच्या महानगरपालिका रुग्णालयातील डॉक्टरांशी संपर्क साधावा.
हे ही वाचा