Kolhapur Municipal Corporation Elections 2022 : राज्यातील मनपा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक कार्यक्रमाचा राजकीय महत्त्वकांक्षेने पूर्णत: खेळखंडोबा झाला आहे. राज्य सरकारने मनपा सदस्यांची संख्या कमी करण्याचा निर्णय घेतल्याने कोल्हापूर महापालिका निवडणुकीची सध्या सुरू असलेली प्रक्रिया रद्द करण्यात आली आहे. याबाबत अध्यादेश निर्गमित करण्यात आला आहे. 


त्यामुळे आजवरच्या तयारीवरील लाखो रुपये, अधिकारी तसेच कर्मचारी यांच्या मेहनतीवर पूर्णत: पाणी फेरले गेले आहे. अधिकारी या दमनकारी प्रक्रियेने पार वैतागून गेले आहेत. राज्य सरकारने जारी केलेल्या नव्या अध्यादेशाने  लोकसंख्येनुसार मनपा सदस्य संख्या 81 होईल. दरम्यान, किती सदस्यांचा एक प्रभाग असेल हे राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानंतर स्पष्ट होईल, अशी माहिती आहे. 


या अध्यादेशामुळे महापालिकेची त्रिसदस्यीय प्रभागरचनेप्रमाणे 92 सदस्यांसाठी सुरू असलेली सर्व निवडणूक प्रक्रिया रद्द झाली आहे. आता नवीन प्रक्रिया सुरू करण्यासाठी राज्य निवडणूक आयोग व राज्य सरकार जे आदेश देईल, त्याप्रमाणे पुढील कार्यवाही होणार आहे. 


राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी काढलेल्या अध्यादेशामध्ये प्रभाग रचनेची जी प्रक्रिया सुरू केली आहे किंवा पूर्ण केली आहे, तसेच आरक्षण सोडत सुरू केली आहे किंवा पूर्ण केली आहे, ती सर्व प्रक्रिया रद्द करण्यात यावी, असे त्यामध्ये नमूद करण्यात आले आहे. त्याचबरोबर सदस्य संख्या लोकसंख्येवर आधारित कमी करण्याचेही नमूद केले आहे. रद्द करण्यात आलेल्या प्रक्रियेमध्ये एका प्रभागात 3 नगरसेवक अशा पद्धतीने तयारी सुरु होती. त्यानुसार 92 नगरसेवक होणार होते. मात्र, आता नव्या निर्णयाने ही प्रक्रिया रद्द होईल.  


आता मनपाची सदस्य संख्या 81 होईल आणि या सदस्य संख्येनुसार प्रभागरचना होणार आहे. अध्यादेशात एकसदस्यीय प्रभागरचनेचा उल्लेख नसल्याने बहुसदस्यीय प्रभागरचनाच राहण्याची शक्यता आहे. 


इतर महत्त्वाच्या बातम्या