Hasan Mushrif on Dhananjay Mahadik : राज्यात सत्तांतर झाल्यानंतर त्याचे परिणाम कोल्हापूर जिल्हा बँक आणि गोकुळमध्येही त्याचे पडसाद उमटतील, असा दावा करणाऱ्या खासदार धनंजय महाडिक यांना माजी मंत्री आमदार हसन मुश्रीफ यांनी खोचक टोला लगावला आहे. ते सतेज पाटील यांना उद्देशून बोलले असावेत, पण मी सुद्धा त्यामध्ये आहे हे त्यांनी विसरू नये, असा टोला त्यांनी धनंजय महाडिक यांना लगावला. 


केडीसीसी बँक आणि गोकुळ दूध संघात सत्तांतर असंभव असल्याचे मुश्रीफ म्हणाले. मुश्रीफ यांनी मध्यवर्ती सहकारी बँकेच्या केंद्र कार्यालयात बोलताना सांगितले की, धनंजय महाडिक यांनी केडीसीसी बँक आणि गोकुळ दूध संघाच्या सत्तेबाबत केलेला दावा मी वाचला आणि बघितला. त्यांनी कदाचित हा दावा आमदार सतेज पाटील यांना नजरेसमोर धरून केला असावा. या दोन्हीही संस्थांमध्ये हसन मुश्रीफ हासुद्धा एक घटक आहे, हे कदाचित ते विसरले असतील.


केडीसीसी बँक आणि गोकुळ या दोन्हीही ठिकाणी सत्ताबदल अजिबात होणार नसल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. जरी सत्ता बदल झाला, तरी ही सगळी माणसं आपल्या जिल्ह्यातील आहेत, कोणी परकी नाहीत. निवडून आलेल्या संचालकांसाठी अनेक सभासदांनी आणि कार्यकर्त्यांनी खस्ता खालेल्या आहेत. त्यामुळे कुणीही कार्यकर्ता आणि संचालक या सत्ताबदलाला अनुकूल नसणार असे त्यांनी नमूद केले.


महाडिकांना खासगीत पटवून सांगू


आमदार मुश्रीफ पुढे  म्हणाले की, धनंजय महाडिक आणि माझी खासगीत भेट झाली, तर मी त्यांना समजावून सांगेन. या दोन्ही संस्थांची आर्थिक प्रगती आणि सभासदाभिमुख कारभार, याबाबत त्यांना सांगेन. 


हसन मुश्रीफ गोकूळमधील कामगिरीवर बोलले


ते म्हणाले की, जिल्हा बँकेची सत्ता अनेक वर्ष आपल्याकडे आहे. मात्र, गोकुळची सत्ता वर्षभरापूर्वीच राष्ट्रवादी आणि काँग्रेसकडे आली आहे. गोकुळच्या इतिहासात म्हशीच्या दुधाला लिटरला 6 रुपये आणि गाईच्या दुधाला लिटरला 5 रुपये इतकी उच्चांकी दूध दरवाढ केलेली आहे. वार्षिक तीन हजार रुपये कोटी रुपयांची वार्षिक उलाढाल वाढलेली आहे. यापूर्वी दूध पावडर निर्मितीमध्ये गोकुळ दूध संघाला कधीच फायदा होत नव्हता. निव्वळ गेल्या आर्थिक वर्षात तब्बल 12 कोटी रुपये फायदा हा दूध पावडर विक्रीमधून झाला आहे.