Raju Shetti : राज्यातील ऊस दरासाठी निर्णायक असणारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेची ऊस परिषद 15 ऑक्टोबरला होणार आहे. संघटनेचे अध्यक्ष आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी याबाबत कोल्हापूरमध्ये घोषणा केली. स्वाभिमानीची 21 वी ऊस परिषद 15 ऑक्टोबरला जयसिंगपूरमधील विक्रमसिंह मैदानावर होणार आहे. 


खतांचे तसेच मजुरीचे वाढलेले दर, साखर कारखान्यांना झालेला नफा लक्षात घेऊन एफआरपीची रक्कम अधिक मिळावी, अशी आमची मागणी असणार असल्याचे राजू शेट्टी यांनी सांगितले. एफआरपीची रक्कम का वाढवून मिळावी यासाठी 9 ठिकाणी ‘जागर एफआरपीचा’ हे अभियान घेऊन याबाबत शेतकऱ्यांना जागरूक केले जाईल, अशी माहितीही त्यांनी दिली. सांगली व कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 24 सप्टेंबर ते 4 ऑक्टोबरपर्यंत 9 दिवस जागर यात्रा निघणार आहे. ही यात्रा सरूड, परिते, गडहिंग्लज, निपाणी, येडेमच्छिंद्र, कुंडल, घुणकी, कागल, दत्तवाड, चंदगड, कोडोली, वळीवडे व कांदे या ठिकाणी ‘जागर एफआरपीचा’ माध्यमातून जनजागृती करण्यात येणार आहे. 


राजू शेट्टी म्हणाले की, चार वर्षांपासून एफआरपीचा दर 2700 ते 2900 इतका आहे, मात्र खतांचे वाढलेले दर, मजुरी लक्षात घेता आता एफआरपीची रक्कम वाढवून मिळणे आवश्यक आहे. केंद्र सरकारने एफआरपीच्या रकमेतजी वाढ केली ती तोडणी, ओढणीमध्येच संपते. आंतरराष्ट्रीय बाजारात भारताच्या साखरेची मागणी वाढल्याने मोठ्या प्रमाणात साखर निर्यात झाली आहे. तसेच इथेनॉल आणि कच्च्या साखरेचे दरही अधिक आहेत. ब्राझिलमध्ये यंदा उसाचे उत्पादन कमी झाले आहे. त्यामुळे पुढील वर्षात भारताच्या साखरेला जागतिक बाजारात चांगली मागणी असेल. 


हे सर्व पाहता साखर कारखान्यांना वाढीव एफआरपी देणे शक्य आहे. तसेच कारखाने जी उपउत्पादने बनवतात, त्याचीची रक्कम शेतकऱ्यांना मिळणे आवश्यक आहे. त्यामुळे आता वाढीव एफआरपी अधिक किती रक्कम हे 15 ऑक्टोबरला होणाऱ्या ऊस परिषदेत ठरेल. याबाबत प्रबोधन कऱण्यासाठी ‘जागर एफ.आर.पीचा’ हे अभियान राबवले जाणार आहे.


शेट्टी पुढे म्हणाले की, तत्कालिन महाविकास आघाडी सरकारने एफआरपीचे तुकडे करण्याचा कायदा करून मोठे नुकसान केले. महाविकास आघाडी सरकारचा निर्णय तातडीने रद्द करावा, यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी केली आहे. जोपर्यंत एकरकमी एफआरपीचा निर्णय होत नाही तोपर्यंत राज्यातील एकही साखर कारखाने सुरू होऊ देणार नाही, आम्ही रस्त्यावरील लढाईला तयार आहोत असा इशाराही शेट्टी यांनी दिला आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या