Kolhapur News : दुर्गम भाग असलेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील शाहुवाडी तालुक्यात वन्यजीवांकडून होणाऱ्या नुकसानीविरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून धडक मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. उद्या (21 मार्च) शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर विठ्ठल मंदिर मलकापूर ते तहसिल कार्यालय शाहूवाडी असा मोर्चा स्वाभिमानीकडून आयोजित करण्यात आला आहे. या मोर्चासाठी गेल्या तीन आठवड्यांपासून राजू शेट्टी यांनी तालुक्यातील वाड्या वस्त्यांवर जाऊन जनजागृती केली आहे. प्रत्यक्ष त्यांना वन्यजीवांकडून होत असलेल्या नुकसानीची माहिती घेत सरकारला जाबव विचारण्यासाठी मोर्चाचे आयोजन केले आहे. 


मोर्चा कोणत्या मागण्यांसाठी?


जंगली प्राण्यांच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना नुकसान भरपाईपोटी 20 लाख रुपये मिळावेत. जखमी शेतकऱ्यांवर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये मोफत उपचार करण्यात यावेत. शेती उपसा पंपाला दिवसा वीजपुरवठा करावा या प्रमुख मागऱ्यांसह अन्य शेतकरी प्रश्नांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने मंगळवारी (21 मार्च रोजी) शाहूवाडी तहसील कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात येणार आहे.  


तसेच, वनविभागाने चांदोली अभयारण्य क्षेत्राभोवती कायमस्वरूपी कुंपण उभारावे, वन्य प्राण्यांकडून होणाऱ्या शेती नुकसान भरपाईपोटी प्रतिगुंठा 3 हजार रुपये मोबदला मिळावा, वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात मृत जनावरांसाठी चालू बाजारभावाप्रमाणे नुकसान भरपाई मिळावी, महावितरण कंपनीकडून प्रस्तावित 37 टक्के वीजदर वाढ रद्द करावी, वास्तव मीटर रिडींग घेऊन कृषी पंपांची वीजबिल आकारणी करावी. रेशनकार्ड अभावी पात्र, गरजू लाभार्थ्यांचा बंद असणारा धान्य पुरवठा सुरू करावा. शेतीपंपांचा वीजपुरवठा खंडीत करू नये, पंपांचे प्रलंबित वीजकनेक्शन तातडीने द्यावे आदी अनेक मागण्यांबाबत शासनाला जाब विचारण्यात येणार आहे. 


वन्यजीवांकडून मोठे नुकसान 


दरम्यान, राजू शेट्टी यांनी ट्विट करून दिलेल्या माहितीनुसार गेल्या पाच वर्षात कोल्हापूर जिल्ह्यात जंगली जनावरांच्या हल्ल्यात 9 लोकांचा मृत्यू झाला आहे. तसेच 65 जखमी झाले आहेत. आतापर्यंत 26 हजार 391 शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे. याच कालावधीमध्ये 444 पाळीव जनावरांचा मृत्यू झाला आहे. मग या सरकारी पाहुण्यांचा किती दिवस पाहुणचार करायचा? राजभवन आणि वर्षा बंगल्यावर असेच जंगली जनावरांचे हल्ले झाले, तर सरकार बघ्याची भूमिका घेईल का? अशी विचारणा त्यांनी केली आहे. 


शाहूवाडी तालुक्यात वाड्या वस्त्यांवर दौरा


मोर्चाबाबत जनजागृती करण्यासाठी शाहूवाडी तालुक्यामध्ये वाड्या वस्त्यांवर राजू शेट्टी यांच्याकडून संपर्क दौरा सुरु आहे. गेल्या तीन दिवसांपासून तालुक्यातील मानोली, आंबा केर्ले, केर्ले धनगर वाडा, घोळसवडे, धावुरवाडा, वारूळ, वालूर, जावली, करुंगळे, अलतुर, पुसार्ळे, भेंडवडे, निनाई परळे, वाकोली, वाकोली धनगरवाडा, लोळाणे, निळे, वीरवाडी, कडवे, म्हालसवडे, म्हालसवडे धनगरवाडा, सुका माळ धनगरवाडा, ऐनवाडी ,ऐनवाडी धनगरवाडा, मुसलमान वाडी, धोपेश्वर धनगरवाडा, पांढरे पाणी, भाततळी, गेळवडे, पारीवणे, मांजरे, शेंबवणे, नवलाईवाडी, गावडी, कुंभवडे, गवळवाडी, अनुस्कुरा, मोसम आदी वाड्यांवर जाऊन लोकांच्या समस्या त्यांनी जाणून घेतल्या आहेत.