Raju Shetti : जुन्या पेन्शनसाठी हटून बसलेल्या राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांच्या संपामुळे शेतकरी मात्र चांगलाच हवालदिल झाला आहे. गेल्या आठवड्याभरापासून राज्यात अवकाळी पाऊस तसेच गारपिटीने विदर्भासह मराठवाड्यामध्ये अतोनात शेतीचे नुकसान झाले आहे. मात्र, या झालेल्या नुकसानीचे कोणत्याही प्रकारे पंचनामे वेळेवर होत नसल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी हतबलता व्यक्त केली आहे. सरकारी संपकऱ्यांना माणुसकीपेक्षा तुमचा संप मोठा झाला का? अशा शब्दांमध्ये विचारणा करत खंत व्यक्त केली आहे. त्यांनी एक प्रकारे कवितेमध्ये भावना व्यक्त करत कुठेतरी हा संप थांबून शेतकऱ्यांचे पंचनामे तातडीने होण्यासाठी आठवण करून दिली आहे. त्यांनी ट्वीट करून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
ट्विटमध्ये राजू शेट्टी म्हणतात
कांदा आंदोलन झालं, कवडीमोड भावाने विकला...
पण तुमच्या भाज्या बेचव होऊ दिल्या का?
ऊस आंदोलन झालं, कारखाने बंद केले..
पण चहातला गोडवा कमी होऊ दिला का?
दूध आंदोलन झालं, वासरांना दुधाने अंघोळ घातली..
पण तुमची लेकरं उपाशी झोपू दिली का?
बऱ्याच वेळा सरकारी कार्यालयांना घेराव घातला...
पण महिला कर्मचाऱ्यांची गैरसोय होऊ दिली का?
सरकारशी संघर्ष झाला, रास्ता रोको केला...
जीवनमरणाच्या दारात उभ्या असणाऱ्या रुग्णांची अडवणूक केली का?
आम्ही संप पुकारले, बंदची हाक दिली...
कधी विद्यार्थ्यांना त्रास दिला का? अत्यावश्यक सेवा थांबवल्या का?
सरकारी संपकऱ्यांनो,आज गारपीठ झाली, अवकाळी झाला...
आता माणुसकी पुढं तुम्हाला संप मोठा झाला का?
आमच्या फळबागा गेल्या, भाजी भाजीपाला सगळं वाहून गेलं..
पंचनाम्याअभावी आमच्या संसारावर आता वरंवटा फिरू दे का?
दरम्यान, गेल्या सात दिवसांपासून शासकीक कर्मचाऱ्यांच्या बेमूदत संपावर कोणत्याही प्रकारचा तोडगा न निघाल्याने जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी संपत दिवसागणिक चिघळत चालला आहे. या मोर्चाकडे सरकारने पूर्णतः दुर्लक्ष केल्याने कोणत्याही प्रकारची चर्चा झालेली नाही. शेतकरी मात्र झालेल्या नुकसानीने चांगलेच अडचणीत आले आहेत. जे काही अवकाळी पावसाने वणार नुकसान झालं आहे त्याचे पंचनामे जर तातडीने झाले नाही तर अगोदरच संकटात असलेल्या शेतकऱ्यांची अवस्था मात्र अत्यंत भीषण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या संपावर कुठेतरी तोडगा काढून बाधित शेतकऱ्यांचे पंचनामे तातडीने व्हायला व्हावेत अशी मागणी आता होऊ लागली आहे.
महत्वाच्या इतर बातम्या :