कोल्हापूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेमध्ये रविकांत तुपकर (Ravikant Tupkar) यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे गेल्या काही दिवसांपासून नाराजीचा सूर आहे. रविकांत तुपकर यांनी माध्यमांमध्ये जाऊन टीका करणे चुकीचे असल्याचेही जाहीरपणे बोलले जात आहे. स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष जालंदर पाटील यांनी रविकांत तुपकरांनी घेतलेल्या भूमिकेवरून खडे बोल सुनावताना खोचक शब्दात समाचार घेतला आहे. जो न्याय सदाभाऊ खोत यांना तुम्ही लावला, तोच न्याय तुमच्याबाबतीत लावला, तर शिस्तपालन समितीला दोष का? अशी विचारणा त्यांनी केली. 


सदाभाऊ खोत यांना तुपकर यांनीच 21 प्रश्न दिले होते


जालंदर पाटील यांनी रविकांत तुपकर यांच्यावर चांगलाच हल्लाबोल केला. ते म्हणाले की, जो न्याय सदाभाऊ खोत यांना तुम्ही लावला, तोच न्याय तुमच्याबाबतीत लावला. सदाभाऊ खोत यांना तुपकर यांनीच 21 प्रश्न दिले होते. राजू शेट्टी (Raju Shetti) यांच्यासमोर बसून काय चुकले हे तुपकर का सांगत नाहीत? पुण्यातील बैठकीला हजर राहतो, असं सांगून तुपकर उपस्थित राहिले नाहीत. तुपकर यांनी आरोप केल्यानंतर राजू शेट्टी यांना म्हणणे मांडण्यास शिस्तपालन समितीने सांगितले. त्यामुळे तुपकर यांनी माध्यमांत टीका करणे हे चुकीचे आहे. 


बुलढाण्यात तुपकर यांना जनाधार किती आहे? 


पाटील यांनी सांगितले की, बुलढाण्यात तुपकर यांना जनाधार किती आहे? कधी कोणती निवडणूक लढवली आहे का? संघटनेच्या कोअर कमिटीमध्ये बसून मार्ग काढता आला असता. 19 तारखेपर्यंत राजू शेट्टी यांनी म्हणणे मांडल्यानंतर दोघांना समोरासमोर बसवले जाईल. कोल्हापूरमध्ये आगामी काळात शिस्तपालन समितीची बैठक होईल. 


रविकांत तुपकरांचे राजू शेट्टी यांना 10 पानी पत्र


दरम्यान, शिस्तपालन समितीच्या सूचनेनुसार रविकांत तुपकर यांनी राजू शेट्टी यांना दहा पानी पत्र पाठवले आहे. हे पत्र माजी खासदार शेट्टी यांना मिळाले आहे. त्यांनी ते समितीकडे दिले आहे. पत्रावर समितीला लेखी म्हणणे देणे आणि प्रसंगी हजर राहून तुपकरांनी घेतलेल्या आक्षेपांवर खुलासा करण्याची भूमिका राजू शेट्टी यांनी घेतली आहे. तुपकर यांनी समितीला दिलेल्या पत्रामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या सुरुवातीपासून ते आजपर्यंतच्या काळातील घडामोडी, संघटनेची विविध आंदोलने, दाखल झालेले शेकडो गुन्हे, पोलिसांचा लाठीमार, तडीपारी, तुरुंगवास याचा उल्लेख केला आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या