कोल्हापूर : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरातील दोन्ही जागांवरून भाजपचे राज्यसभा खासदार धनंजय महाडिक (Dhananjay Mahadik) यांनी महत्वपूर्ण सुतोवाच केले आहेत. विद्यमान खासदारांना तिकिट मिळतील असा आशावाद व्यक्त करतानाच भाजपची सुद्धा अप्रत्यक्ष मागणी असल्याचे त्यांनी सूचित केले आहे.  


धनंजय महाडिक काय म्हणाले?  


खासदार महाडिक म्हणाले की, कोल्हापूरचे दोन्ही विद्यमान खासदार शिवसेना शिंदे गटाचे आहेत. त्यामुळे भविष्यात तेच लोकसभेचे उमेदवार असतील अशी अपेक्षा आहे. मात्र, उमेदवारीची मागणी प्रत्येक पक्ष करत असतो. त्याप्रमाणे भाजपनेही लोकसभा, विधानसभेच्या अधिकच्या जागेची मागणी केली आहे. परंतु, अंतिम निर्णय देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजितदादा पवार मुंबईला घेतील आणि त्यानंतर दिल्लीवरुन उमेदवारीवर शिक्कामोर्तब होईल. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी बांधणी सुरू केली आहे. भाजपनं देखील मोठ्या प्रमाणात बांधणी सुरू केली आहे. बूथ स्तरापासून कार्यक्रम राबविण्यापर्यंत जनसंपर्क सुरू आहे. लोकसभेच्या उमेदवारीचा निर्णय अंतिम टप्प्यात होईल असंही महाडिक म्हणाले. 


काँग्रेसकडून कोल्हापूरसाठी आग्रह 


दरम्यान, तीन दिवसांपूर्वीच काँग्रेसचे जिल्हा निरीक्षक माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा दोनदिवसीय दौरा पार पडला. या दौऱ्यामध्येही काँग्रेसकडूनही कोल्हापूरच्या दोन्ही जागेवर दावा करण्यात आला आहे. दोन दिवसांचा आढावा घेतल्यानंतर पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, फुटीचा परिणाम काय होईल यासाठी आढावा बैठक घेतली. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेतला. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झालेल्या फुटीनंतर झालेल्या स्थित्यंतराचा आढावा घेतला. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काय चाललं आहे हे निश्चितपणे काही कोणाला माहिती नाही.  


ते पुढे म्हणाले की, राजकीय तुलनात्मक अभ्यास केला. माझा अहवाल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसकडे पाठवणार आहे. पुढील रणनीती कशी अखायची आणि जागावाटप कसे करायचे यासाठी मदत होईल. कोल्हापुरातील दोन्ही जागा काँग्रेस पक्षाने लढवाव्या अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली आहे. दुसरीकडे, हातकणंगले मतदारसंघातून भक्कम तयारी करत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी एकला चलो रे ची भूमिका घेतली आहे. या पार्श्वभूमीवर पृथ्वीराज चव्हाण यांनी मोठे वक्तव्य केलं. चव्हाण यांनी राजू शेट्टी यांना महाविकास आघाडीत घेण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगितले. मात्र, कोणत्या पातळीवर राजू  शेट्टी यांच्याशी चर्चा झाली, याचा तपशील जाहीर करण्यास नकार दिला.


इतर महत्वाच्या बातम्या