Kolhapur : गेल्या पाच वर्षांपासून कोल्हापूरातील 500 हुन अधिक तरुण एकत्र येत कॅन्सरग्रस्त रुग्णांना आर्थिक मदत करत आहेत. 'नो शेव्ह नोव्हेंबर' असे त्यांच्या मोहिमेचे नाव आहे. कोल्हापुरात ही मोहीम दरवर्षी चांगलीच चर्चेत असते. दरवर्षी एक महिना दाढी न करता त्यावर होणारा खर्च वाचवून ते पैसे मदत म्हणून कॅन्सरग्रस्त रुग्णांना देतात अशी ही मोहीम आहे. यावर्षी सुद्धा पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे सचिव शिवराज नायकवडे आणि कोल्हापूर प्रेस क्लब पदाधिकाऱ्यांच्या हस्ते 6 रुग्णांना प्रत्येकी 10 हजार रुपये मदत करण्यात आली. यावेळी मान्यवरांनी या मोहिमेचे कौतुक करत यापुढच्या काळात सुद्धा ही मोहीम अधिकाधिक मोठी व्हावी या शुभेच्छा दिल्या.
काय आहे कोल्हापूरातील 'नो शेव्ह नोव्हेंबर' मोहीम?
जगभरात नोव्हेंबर महिन्यात 'नो शेव्ह नोव्हेंबर' ही मोहीम सुरू असते. याच मोहिमेचे कोल्हापुरातील तरुणांनी 5 वर्षांपूर्वी अनुकरण करायचे ठरविले. त्यानुसार त्यांनी व्हाट्सअँप ग्रुपच्या माध्यमातून युवकांना जोडण्याचे काम सुरू केले. त्यांच्या या मोहिमेला आजपर्यंत कोल्हापुरातील 500 हुन अधिक तरुणांनी पाठिंबा दिला आहे आणि दरवर्षी ही संख्या वाढतच चालली आहे. याअंतर्गत दरवर्षी एक महिना दाढी न करता दाढीसाठी जेव्हढे पैसे खर्च होतात ते वाचवून ती रक्कम कॅन्सरग्रस्त रुग्णांना उपचारासाठी द्यायची या उद्देशाने ही मोहीम हाती घेतली. सुरुवातीला या मोहिमेबद्दल माहिती मिळाल्यानंतर शेखर पाटील आणि दर्शन शहा यांनी हा विचार त्याच्या मित्रमंडळींना बोलून दाखवला होता. त्यानुसार हा विचार एका मोहिमेत बदलला. कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातच कर्करोगाचे हजारो रुग्ण आहेत. त्यांच्यासाठी आणि कोल्हापूर जिल्ह्यातील रुग्णांसाठी आपण ही मोहीम सुरू करू असा निर्णय सर्वांनी केला. त्यानुसार सलग 5 वर्षे ही मोहीम अगदी उत्साहाने राबविण्यात येत आहे. दरवर्षी याला प्रतिसाद वाढतच असून अनेक रुग्णांना यामुळे आर्थिक मदत किली जात आहे. आजपर्यंत जवळपास 20 रुग्णांना आर्थिक मदत केली आहे.
विशेष म्हणजे पोलिसांपासून वकील, शिक्षक, डॉक्टर, इंजिनिअर, सीए, पत्रकार, राजकीय व्यक्ती तसेच सामाजिक कार्यकर्ते सुद्धा जोडले गेले असून ते सुद्धा युवकांसोबतच आपल्या परीने दाढीवर होणारा एक महिन्याचा खर्च वाचवून मोहिमेला देत आहेत. त्यामुळे या मोहिमेला अनेक मोठ्या व्यक्तींचा सुद्धा हातभार लागत आहे हे या मोहिमेचे यश असल्याचे ग्रुपच्या सदस्यांनी म्हटले आहे.
25 हून अधिक कॅन्सरग्रस्त रुग्णांना मदत
या मोहिमेची आजपर्यंत पाच वर्षे पूर्ण झाली आहेत. प्रत्येक वर्षी आधीपेक्षा अधिकच प्रतिसाद मिळत चालला आहे. जवळपास 500 तरुण मोहिमेत सक्रिय झाले असून ग्रुपच्या माध्यमातून दरवर्षी 4 ते 5 कॅन्सरग्रस्त रुग्णांच्या नातेवाईकांना जमा झालेली मदत देण्यात येते. आजपर्यंत 25 कॅन्सरग्रस्त रुग्णांना मदत करण्यात आली असून जवळपास दोन ते अडीच लाखांहून अधिक मदत करण्यात आली आहे. दरम्यान, कोल्हापूरात अशा पद्धतीची मोहीम यापूर्वी कधीच पाहिली नाही. पण या तरुणांनी ज्या पद्धतीने ही मोहीम हाती घेतली आहे याचे खुप कौतुक वाटत असल्याच्या भावना कॅन्सरग्रस्त रुग्णांच्या नातेवाईकांकडून दरवर्षी ऐकायला मिळतात.
यापुढे मोहिमेच्या माध्यमातून रुग्णांना विविध योजनांची देखील माहिती करून देऊ
कॅन्सरग्रस्त रुग्णांच्या वेदना वाटून घेता येत नसल्या तरी त्यांच्याबद्दल सहानुभूती व्यक्त करता येऊ शकते. हा विचार घेऊन ही मोहीम कोल्हापूर जिल्ह्यात मोठ्या जोमाने यावर्षी पार पडत आहे. यापुढेही या ग्रुपच्या माध्यमातून असेच जोमाने काम करू असा विश्वास ग्रुपच्या सदस्यांनी व्यक्त केला आहे. शिवाय यापुढे कॅन्सरग्रस्त रुग्णांना विविध योजनांची देखील विविध उपक्रम घेऊन माहिती करून देणार असून त्यांच्या उपचारासाठी मदत करणार असल्याचे ग्रुपच्या सदस्यांनी म्हंटले आहे. आजच्या या मदत वाटप कार्यक्रमाला देवस्थान समितीचे सचिव शिवराज नायकवडे, प्रेस क्लबचे अध्यक्ष मोहन मेस्त्री, उपाध्यक्ष विजय केसरकर, कार्याध्यक्ष उद्धव गोडसे, सचिव मनजीत भोसले आणि नो शेव्ह नोव्हेंबर मोहिमेचे शेखर पाटील, दर्शन शहा यांच्यासह सदस्य उपस्थित होते.
इतर महत्वाच्या बातम्या