Satej Patil on Dhananjay Mahadik : राज्यसभा खासदार धनंजय महाडिक यांनी राज्यात सत्तांतर होताच त्याचे परिणाम कोल्हापूर जिल्हा बँक तसेच गोकुळवरही होतील, असा दावा केला होता. यानंतर कोल्हापूरच्या राजकारणात चांगलाच कलगीतुरा रंगला आहे. जिल्हा बँकेचे अध्यक्ष आमदार हसन मुश्रीफ यांनी धनंजय महाडिक यांना प्रत्युत्तर दिल्यानंतर आमदार सतेज पाटील यांनीही आज जोरदार पलटवार केला आहे. 


राज्यातील सत्तांतराचा जिल्ह्यातील सहकारावर कोणताही परिणाम होणार नसल्याचे सतेज पाटील म्हणाले. एका प्रवृत्तीच्या विरोधात नागरिक गेले आहेत, त्यामुळे गोकुळमध्ये सत्तांतर झाल्याचा टोला त्यांनी धनंजय महाडिक यांना लगावला. सत्ता बदल झाल्याने त्यांना कदाचित असं वाटत असेल, पण आम्ही सत्ता असो किंवा नसो आम्ही कायम जनतेत असतो असे पाटील म्हणाले. 


राजर्षी शाहू महाराज यांच्या समाधी स्थळासाठी दिलेला निधी रोखणे योग्य नाही


शिंदे सरकारकडून सत्तेत आल्यानंतर महाविकास आघाडी सरकारकडून विकासकामांना स्थगिती देण्याचा सपाटा सुरु आहे. त्यामुळे राजर्षी शाहू महाराज यांच्या समाधीस्थळासाठी दिलेला निधी रोखला गेला आहे. यावरून बोलताना ते म्हणाले की, अशा प्रकारे निधी रोखणे योग्य नसल्याचे ते म्हणाले. याबाबत दोन्ही काँग्रेसचे शिष्टमंडळ मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना भेटल्याचे त्यांनी सांगितले. 


कोल्हापूर विमानतळ विस्तारीकरण संदर्भामध्ये बैठक


दरम्यान, आज कोल्हापूर विमानतळ विस्तारीकरण संदर्भामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक पार पडली. यावेळी कोल्हापूर विमानतळ विस्तारीकरणासाठी आवश्यक असलेल्या भूसंपादनाच्या प्रक्रियेसह अन्य आवश्यक कामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्याची माहिती सतेज पाटील यांनी दिली. 


महाविकास आघाडी सरकारने कोल्हापूर विमानतळ विकासासाठी 212 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला होता. यातून सुमारे 1800 खातेदारांची 64 एकर जमिन संपादित करण्यात येणार आहे. या सोबतच यावेळी विमानतळ विस्तारीकरणासाठी ट्रान्समिशन, विद्युत व्यवस्था, अंतर्गत रस्ते आदी विविध विकास कामांचा आढावा घेतल्याचे त्यांनी सांगितले.