कोल्हापूर : गेल्या दोन महिन्यांपासून आंदोलन करूनही साखरसम्राटांनी बेदखल केल्यानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे (Swabhimani Shetkari Saghtana) अध्यक्ष राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी कोल्हापुरात पुणे बंगळूर महामार्गावर चक्काजाम सुरु केला आहे. राजू शेट्टी यांनी चक्काजाम केल्यानंतर आता साखर कारखानदारांकडून दराची पहिली पुडी सोडण्यात आली आहे. 


कोल्हापूर जिल्ह्यातील काही कारखानदार 100 रुपये देण्यास तयार


दराची कोंडी फोडण्यासाठी साखर कारखान्यांनी तयारी दर्शवली आहे, पण गेल्यावर्षीची अट घालू नका, अशी अट घातली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील काही कारखानदार 100 रुपये देण्यास तयार झाले आहेत. मात्र, हायवेवर मुक्काम ठोकलेल्या राजू शेट्टी यांनी आपला पवित्रा कायम ठेवला आहे. गेल्यावर्षीचे म्हणून 100 रुपये द्या, या भूमिकेवर राजू शेट्टी ठाम आहेत. मागणी मान्य होत नाही तोपर्यंत महामार्ग सोडणार नसल्याचा निर्धार राजू शेट्टी यांनी केला आहे. 


सतेज पाटील आणि हसन मुश्रीफ कारखानदारांवर दबाव टाकला 


हायवेवर चक्काजाम केल्यानंतर एबीपी माझाने राजू शेट्टी यांच्याशी संवाद साधला. ते म्हणाले की, सतेज पाटील आणि हसन मुश्रीफ कारखानदारांवर दबाव टाकला आहे. त्यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व साखर कारखाने बंद असल्याचा दावा केला. सकाळी साडे अकरा वाजल्यापासून आंदोलनाला सुरुवात झाली. आंदोलनाला सुरुवात झाल्यानंतर राजू शेट्टी यांनी शेतकऱ्यांनी एकटं पाडलं नसल्याचे सांगितले. गेल्या दोन महिन्यांपासून आम्ही लढत असताना दखल घेतली नसल्याचे ते म्हणाले. 


पर्यायी मार्गाने वाहतूक सुरु


दरम्यान, हायवेवर चक्काजाम आंदोलन सुरु केल्यानंतर आता पर्यायी मार्गाने वाहतूक सुरु करण्यात आली आहे. कोल्हापूर पोलिसांकडून आंदोलनलस्थळी तगडा बंदोबस्त करण्यात आला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील कागल येथून तळंदगे फाटा-हातकणंगले-जयसिंगपूर-इस्लामपूर-पेठ नाका येथून पुण्याकडे जाण्यास वाहतूक वळवण्यात आली आहे. कोल्हापुरातून बेळगावकडे जाण्यासाठी कसबा बावडा-कोल्हापूर शहर शिवाजी विद्यापीठ मार्गे वाहतूक वळवण्यात आली आहे. 


शरीरात रक्ताचा थेंब असेपर्यंत शेतकऱ्यांसाठी लढत राहणार


राजू शेट्टी यांनी आंदोलनाला प्रारंभ होण्यापूर्वी सांगितले की, शरीरात रक्ताचा थेंब असेपर्यंत शेतकऱ्यांसाठी लढत राहणार आहे. आमच्या अनेक कार्यकर्त्यांना पोलिसांनी रात्रीच ताब्यात घेतलं आहे. मात्र, शेतकरी भावांनो मिळेल त्या वाटेने पोलिसांना चुकून महामार्गावर या. सरकार आणि साखर कारखानदारांना गुडघे टेकायला लावू, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष व माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिला आहे. गतवर्षीच्या उसाला प्रतिटन शंभर रुपये साखर कारखान्यांनी आणि तीनशे रुपये सरकारने द्यावेत, कारखान्यांनी शंभर रुपयांपेक्षा जादा रकमेचा दुसरा हप्ता द्यावा आणि खुशाल साखर कारखाने सुरू करावेत, असे आवाहन शेट्टी यांनी केले


इतर महत्वाच्या बातम्या