Shooting World Cup : कोरियामधील चेंगवान येथे सुरू असलेल्या आंतरराष्ट्रीय विश्वचषक शूटिंग स्पर्धेत कोल्हापूरचा आंतरराष्ट्रीय नेमबाज शाहू माने (Shahu mane) याने (Air Rifle Mixed Team competition) भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करताना महिला नेमबाज मेहुली घोष हिच्या साथीने 10 मीटर एअर रायफल मिश्र या प्रकाराचे सुवर्णपदक पटकावले. स्पर्धेतील भारताचे हे दुसरे सुवर्णपदक ठरले.
पात्रता फेरीत शाहू माने व मेहुली यांनी सहभागी 30 संघांमध्ये सर्वाधिक 634:3 गुण पटकावत प्रथम तर हंगेरीच्या संघाने 630:3 गुण घेऊन द्वितीय स्थान पटकावत थेट अंतिम फेरीत प्रवेश केला. सुवर्ण पदकासाठी झालेल्या अंतिम फेरीत हंगेरीचे ऑलिम्पिकपटू ईस्तवान पेनी व ईस्तर मेसझारोस हे दोघेही अनुभवी असल्याने त्यांनी शाहू व मेहुली यांच्याविरुद्ध चांगली सुरुवात केली. मात्र, शाहू व मेहुली यांनी जोरदार प्रतिकार करून 17 विरुद्ध 13 अशी बाजी मारत सुवर्णपदक जिंकले.
शाहू या स्पर्धेमध्ये सांघिक प्रकारामधूनही भारताचे प्रतिनिधित्व करत आहे. अर्जुन बबुता (पंजाब) व पार्थ माखिजा (दिल्ली) यांच्यासह भारतीय संघ पात्रता फेरीत द्वितीय स्थान पटकावून थेट सुवर्ण पदकाच्या लढतीसाठी पात्र झाला आहे. गुरुवारी पहाटे त्यांची यजमान कोरिया संघाविरुद्ध सुवर्ण पदकासाठी लढत होणार आहे.
शाहू हा केआयटी कॉलेजमध्ये मेकॅनिकल विभागात दुसऱ्या वर्षामध्ये शिकत आहे. त्याला संस्थेचे अध्यक्ष सुनील कुलकर्णी, उपाध्यक्ष साजिद हुदली, सचिव दीपक चौगुले, कार्यकारी संचालक डॉ. व्ही. व्ही. काजत्री, प्रभारी संचालक डॉ. एम. एम. मुजुमदार, सल्लागार मोहन वनरोट्री, मेकॅनिकल विभाग प्रमुख डॉ. उदय भापकर, क्रीडा विभाग प्रमुख विजय रोकडे यांचे मार्गदर्शन लाभले.
इतर महत्वाच्या बातम्या