Encroachment On Vishalgad : शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या ऐतिहासिक किल्ले विशाळगडावरील अतिक्रमणाविरोधात कोल्हापूर शिवसैनिक चांगलेच आक्रमक झाले. शिवसैनिकांनी शिवाजी चौकामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून विशाळगडाकडे कूच करण्याचा प्रयत्न केला. मात्र, कोल्हापुरातच पोलिसांनी शिवसैनिकांना अडवले. कोल्हापूर पोलिसांनी राज्य सरकारच्या दबावामुळे आम्हाला विशाळगडावर सोडलं नाही. मात्र, गनिमी काव्याने आम्ही विशाळगडाकडे जाणार असल्याचा इशारा कोल्हापुरातील शिवसैनिकांनी बोलून दाखवला.
कोल्हापूर जिल्ह्यातील विशाळगडावरीलअतिक्रमण काढण्याची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे. मात्र, हे अतिक्रमण हटवण्यासाठी जिल्हा प्रशासन कमी पडत असल्याचा आरोप शिवसैनिकांनी केला. जिल्हा प्रशासनाने महाशिवरात्रीपूर्वी अतिक्रमण काढून टाकले जाईल, असं आश्वासन दिलं आहे. मात्र, गडावरील अतिक्रमण हटवण्यास अद्याप सुरुवात झालेली नाही. त्यामुळे कोल्हापुरातील शिवसैनिकांनी अवजारे घेऊन विशाळगडाकडे जाण्याचा प्रयत्न केला.
दरम्यान, संभाजीराजे छत्रपती यांनी (Sambhajiraje on Vishalgad Fort) विशाळगडावरीलअतिक्रमणावरून इशारा दिल्यानंतर जिल्हा प्रशासनाने महाशिवरात्रीपूर्वी पूर्णपणे अतिक्रमण काढून टाकणार असल्याची ग्वाही दिली होती. त्यानंतर निर्वाणीचा इशारा दिला होता. वन विभागाने 9 आणि 10 डिसेंबर रोजी सलग दोन दिवस कारवाई करताना गडबुरुज, पायथ्यावरील दोन अतिक्रमणे जमीनदोस्त केली होती. पक्की बांधकामे असणाऱ्या अतिक्रमणधारकांनी 15 दिवसांत बांधकामे काढून घ्यावीत, अन्यथा कारवाई करू, असा सूचित इशारा उपवनसंरक्षक जी. गुरुप्रसाद यांनी दिला आहे.
दुसरीकडे वन विभागाने कारवाई सुरू केल्याने अतिक्रमणधारकांचे धाबे दणाणले आहेत. वनविभागाने गडबुरुजाजवळील शेड व पायथ्याजवळ शीतपेय दुकानच्या शेडवर कारवाई केली आहे. पायथा परिसरात वन विभागाच्या मालकीच्या जागेत 20 हून अधिक अतिक्रमणे आहेत. नुकसान टाळण्यासाठी सर्व बांधकामे संबंधितांनी स्वतः 15 दिवसांत काढून घ्यावीत, असेही वनविभागाकडून सांगण्यात आले आहे.
संभाजीराजे यांनी अतिक्रमणे हटवताना कुणाचा दबाव खपवून घेऊ नका असे प्रशासनास सांगितलं आहे. हा दर्गा शिवाजी महाराजांच्या आधीपासून आहे. मात्र, त्यानंतर जे काही बांधलं आहे, जे अतिक्रमण केलं आहे ते काढलं पाहिजे. अतिक्रमण करण्यासाठी ज्यांनी परवानगी दिली त्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केल्याचेही संभाजीराजे म्हणाले होते.
इतर महत्वाच्या बातम्या
