कोल्हापूर : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर (Maharashtra Vidhan Sabha Election 2024) राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आज (2 सप्टेंबर) तब्बल चार दिवसांच्या कोल्हापूर दौऱ्यासाठी आज दुपारी बाराच्या सुमारास कोल्हापूरमध्ये पोहोचले. शरद पवार यांना कोल्हापूरमध्ये राष्ट्रपती द्रौपुदी मुर्मू यांच्या दौऱ्यामुळे वाहतूक कोडींचा फटका बसला. त्यामुळे वाहतूक कोंडीत त्यांचा ताफा अडकला. यानंतर गाडीतून खाली उतरून सुरक्षारक्षकांनी रस्ता रिकामा केला.
समरजित घाटगे शरद पवारांच्या स्वागताला पोहोचले
शरद पवार यांचे कोल्हापूरमध्ये आगमन झाल्यानंतर कोल्हापूर जिल्हा पदाधिकारी त्यांच्या स्वागतासाठी पोहोचले. पदाधिकाऱ्यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी काँग्रेस जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील सुद्धा उपस्थित होते. भाजपचे माजी ग्रामीण जिल्हाध्यक्ष समरजितसिहं घाटगे सुद्धा शरद पवार यांच्या स्वागतासाठी पोहोचले. घाटगे यांनी काही दिवसांपूर्वीच भाजपला रामराम करीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. उद्या (3 सप्टेंबर) कागलमध्ये सायंकाळी चार वाजता गैबी चौकात शरद पवार यांच्या उपस्थितीत तुतारी फुंकणार आहेत. कार्यकर्त्यांच्या मेळाव्यामध्ये समरजित यांनी तुतारी फुंकण्याचा निर्मय केला होता.
केशवराव भोसले नाट्यगृहाची पाहणी करणार
दरम्यान, शरद पवार चार दिवसांच्या दौऱ्यामध्ये उद्या मंगळवारी सकाळी दहा वाजता केशवराव भोसले नाट्यगृहाची पाहणी करणार आहेत. केशवराव भोसले नाट्यगृह आगीच्या भक्षस्थानी पडलं आहे. सायंकाळी चारच्या सुमारास ते कागलमध्ये समरिजत घाटगे यांच्या पक्षप्रवेशासाठी पोहोचतील. बुधवारी भारत पाटणकर यांच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त कोल्हापुरात शाहू सभागृहात सत्कार करण्यात येणार आहे. त्यानंतर शरद पवार यांची राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांसोबत बैठक होणार आहे. गुरुवारी स्वर्गीय पतंगराव कदम यांचा पुर्णाकृती पुतळ्याच्या लोर्कापणासाठी ते सांगलीमध्ये जातील. त्या कार्यक्रमानंतर ते बारामतीकडे प्रस्थान करतील.
समरजित घाटगे सतेज पाटलांच्या भेटीला
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसमधील प्रवेश निश्चित झाल्यानंतर समरजित घाटगे यांनी जिल्ह्यातील महाविकास आघाडीमधील नेत्यांच्या भेटीगाठी सुरु केल्या आहेत. रविवारी समरजित यांनी कोल्हापूर काँग्रेस जिल्हाध्यक्ष सतेज पाटील यांची भेट चर्चा केली. तत्पूर्वी, समरजित यांनी कोल्हापूरचे खासदार शाहू महाराज यांचीही भेट घेत चर्चा केली होती. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी त्यांनी सतेज पाटील यांची मदत मिळावी, अशी अपेक्षा व्यक्त केली. सतेज पाटील आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांची मैत्री सर्वश्रुत आहे. त्यामुळे ही बैठक महत्त्वपूर्ण मानली जात आहे.
इतर महत्वाच्या बातम्या