कोल्हापूर : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) कोल्हापुरात (Kolhapur News) येत्या आठवड्यात एकाच व्यासपीठावर असणार आहेत. संजय घोडावत विद्यापीठात होत असलेल्या मुख्याध्यापक संघाच्या अधिवेशनासाठी दोन्ही नेते एकत्र येणार आहेत. 17 नोव्हेंबर रोजी मुख्याध्यापक संघांचं अधिवेशन पार पडणार आहे. विशेष बाब म्हणजे याच दिवशी मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) लढा पुकारलेल्या मनोज जरांगे-पाटील (Manoj Jarange Patil) यांचाही कोल्हापूर दौरा असणार आहे. त्यामुळे दिवाळीनंतर राजकीय आतषबाजाची दिवाळी कोल्हापुरात होणार आहे. 


संजय घोडावत विद्यापीठात महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक संघाचे वार्षिक अधिवेशन पार पडणार आहे. या अधिवेशनसाठी शरद पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आले आहे. या दोन्ही नेत्यांनी कार्यक्रमाला उपस्थित राहण्याबाबत सहमती दर्शवली आहे. 


जरांगे पाटीलही कोल्हापुरात 


मराठा आरक्षणासाठी आग्रही असलेले आणि सातत्याने आंदोलनाच्या माध्यमातून आपली मागणी लावून धरणारे मनोज जरांगे-पाटील यांनी महाराष्ट्र दौऱ्याची घोषणा केली आहे. दिवाळीनंतर 15 नोव्हेंबरपासून मनोज जरांगे-पाटील महाराष्ट्र दौऱ्याला सुरवात करणार आहेत. आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलनाचा जोर कायम ठेवण्याच्या दृष्टिकोनातून दौऱ्याचे आयोजन करण्यात आलं आहे. मागील महाराष्ट्र दौऱ्यात ज्या भागात जाणे झाले नाही त्या ठिकाणी जाणार असल्याचे जरांगे पाटील यांनी म्हटले आहे. 17 नोव्हेंबर रोजी जेव्हा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शरद पवार जेव्हा एकाच व्यासपीठावर असतील त्याच वेळी जरांगे पाटील यांचा कोल्हापूर दौरा देखील सुरू असेल.


शाहू महाराजांनी घेतली होती मनोज जरांगे पाटलांची भेट 


महाराष्ट्रात आरक्षणाचा पाया करवीरनगरीत राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी घातला होता. त्याच नगरीत मनोज जरांगे पाटील आरक्षणाचा लढा तीव्र करण्यासाठी दौऱ्यावर येत आहेत. मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटीत आमरण उपोषण सुरु केल्यानंतर श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांनी त्यांची भेट घेतली होती. या भेटीत मनोज जरांगे पाटील यांना शाहू महाराज यांनी पाणी घेण्याची विनंती केल्यानंतर त्यांनी मान देत पाण्याचा घोट घेतला होता. यावेळी उपोषणस्थळावरून बोलताना शाहू महाराज यांनी राज्य सरकारला मनोज जरांगे पाटील यांचा शब्द मानावाच लागेल, अशी प्रतिक्रिया दिली होती.  


इतर महत्वाच्या बातम्या