कोल्हापूर : नागपूर ते गोवा प्रस्तावित शक्तिपीठ महामार्गाच्या विरोधात मंगळवारी राज्यातील बारा जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांनी एल्गार पुकारला. कोल्हापुरात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्ग सुमारे दीड तास रोखून सरकारला सज्जड इशारा दिला. कोणत्याही परिस्थितीत शक्तिपीठ महामार्ग होऊ देणार नाही अशी भूमिका शेतकऱ्यांनी घेतल्याने आता सरकारची चांगलीच कोंडी होणार आहे. 

Shaktipeeth Highway : शक्तिपीठच्या विरोधात शेतकरी ठाम

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट असणारा नागपूर ते गोवा या शक्तिपीठ महामार्गाला सुरुवातीपासूनच विरोध होऊ लागला आहे. बारा जिल्ह्यातून जाणाऱ्या या शक्तिपीठ महामार्गासाठी  86,000 कोटीचा चुराडा होणार आहे. तर हजारो हेक्टर सुपीक जमीन ही या महामार्गामुळे बाधित होणार आहे. त्यातच शेतकऱ्यांना तुलनेत कमी मोबदला मिळणार असल्याने शेतकऱ्यांनी शक्तिपीठ महामार्गाविरोधात कृती समितीच्या माध्यमातून राज्यातील बारा जिल्ह्यांमध्ये अक्षरशः रान पेटवले आहे. 

Shaktipeeth Expressway : राज्यातल्या 12 जिल्ह्यांतील शेतकऱ्यांचा विरोध

सोमवारी कोल्हापूरसह बारा जिल्ह्यात रास्ता रोको आंदोलन करत सरकारला पावसाळ्यातही शेतकऱ्यांनी चांगलाच  घाम फोडलाय. कोल्हापुरात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर पंचगंगा नदीजवळ महामार्ग रोको आंदोलन केले. यावेळी शेकडो शेतकऱ्यांनी घोषणाबाजी करत शक्तिपीठ रद्द झालाच पाहिजे असा नारा दिला.

Raju Shetti On Shaktipeeth Highway : राजू शेट्टी विठुरायाला साकडं घालणार 

दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पंढरपूरला एकादशीला विठ्ठलाची पूजा करण्यासाठी जाणार आहेत. त्यांना विठ्ठलाने सुबुद्धी द्यावी आणि शक्तिपीठ रद्द करावा असं साकडे घालण्यासाठी राजू शेट्टी   पंढरपूरला जाणार आहेत. सरकारने शक्तिपीठ महामार्ग हा प्रतिष्ठेचा विषय करू नये. शक्तिपीठ महामार्गाला विरोध म्हणजे विकासाला विरोध असे समजू नये. ड्रोनद्वारे शेत जमिनीची मोजणी करण्यास कोणी आले तर गोफनद्वारे ड्रोन फोडू असा इशारा राजू शेट्टी यांनी दिला.

Kolhapur Protest Against Shaktipeeth Highway : शेतकऱ्यांची मोठी गर्दी

दरम्यान, सकाळी 10 वाजल्यापासून मोठ्या संख्येने शेतकरी हे पंचगंगा पुलावती जमायला सुरुवात झाली. यावेळी शेतकऱ्यांनी हातात फलक घेऊन शक्तिपीठ महामार्गाला तीव्र विरोध असल्याचं निदर्शनास आणून दिलं. दरम्यान, कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी देखील मोठा बंदोबस्त तैनात केला होता. हा शक्तिपीठ महामार्ग रद्द करेपर्यंत लढाई सुरू होणार असल्याचे शेतकऱ्यांनी म्हटल आहे.

एकूणच पाहिलं तर शक्तिपीठ महामार्ग रद्द करावा यासाठी कोल्हापुरात सुरू असणाऱ्या रास्ता रोको आंदोलनादरम्यान काही शेतकऱ्यांनी पंचगंगा नदी पात्रात उड्या मारण्याचाही प्रयत्न केला. सरकार हा शक्तीपीठ महामार्ग करून आमच्या जमिनी काढून घेऊन आमचं उपजीविकेचे साधनच नष्ट करत आहे. मग आम्ही जगू कशाला? असं म्हणत नदीपात्रात उड्या मारण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी बळाचा वापर करून त्यांना रोखलं.

Nagpur Goa Expressway : विधानसभेतही विरोध सुरू

शक्तिपीठ महामार्ग विरोधात कोल्हापूरसह राज्यभरात उद्रेक झाला. त्यातच विधानसभा सुरू असल्याने काही आमदारांनीही शक्तिपीठ महामार्गाबाबत तीव्र लढा उभारून हा मार्ग रद्द करण्यासाठी प्रयत्न करू असे म्हटले आहे. त्यामुळे रस्त्यावरच्या लढाई सोबतच विधानसभेतही आमदारांकडून याला तीव्र विरोध होणार हे मात्र निश्चित आहे.

ही बातमी वाचा: