कोल्हापूर : अजित पवार यांनी राष्ट्रवादीला खिंडार पाडल्यानंतर शरद पवार यांनी पक्षबांधणीसाठी महाराष्ट्र पिंजून काढण्यास सुरुवात केली आहे. फुटीर अजित पवार गटात सामील झालेल्या हसन मुश्रीफ यांना शह देण्यासाठी शरद पवार यांची कोल्हापुरात (Kolhapur News) ऐतिहासिक दसरा चौकात 25 ऑगस्ट रोजी भव्य राजकीय सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेच्या अध्यक्षस्थानी श्रीमंत छत्रपती शाहू महाराज असतील. त्यामुळे महाविकास आघाडीच्या नेत्यांनी गेल्या काही दिवसांपासून सुरु केलेल्या प्रयत्नांना यश मिळाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. 


गेल्या वर्षभरापासून राज्यातील राजकीय समीकरणे बदलल्यापासून कोल्हापूर जिल्ह्यात महाविकास आघाडीचा लोकसभेसाठी रिंगणात कोण असणार? याचीच चर्चा सुरु आहे. त्यामुळे श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांनीच आता खासदारकीच्या रुपातून कोल्हापूरचे पालकत्व घ्यावे, यासाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांचे प्रयत्न सुरु आहेत. मात्र, महाराजांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नव्हती. मात्र, आता राजकीय व्यासापीठावर येत असल्याने महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या प्रयत्नांना यश मिळण्याची शक्यता आहे. 


गेल्या काही महिन्यांपासून शाहू महाराजांनीच लोकसभेची उमेदवारी घ्यावी, यासाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून प्रयत्न सुरु आहेत. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनीही त्यांची राजवाड्यावर जाऊन भेट घेतली होती. शाहू महाराज यांचा महाविकास आघाडीमधील तिन्ही पक्षातील नेत्यांशी तसेच जिल्ह्यामध्येही घनिष्ठ संबंध आहेत. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत जागा वाटपात महाविकास आघाडीच्या कोणत्याही पक्षाकडे ही जागा आली, तरी महाराजांना उमेदवारी कोणतीही अडचण असणार नाही.


अमृतमहोत्सवी वाढदिवसाला सर्वपक्षीयांची मांदियाळी 


शाहू महाराज यांचा जानेवारी महिन्यात अमृतमहोत्सवी वाढदिवस दणक्यात साजरा करण्यात आला होता. खासबाग मैदानात झालेल्या या सोहळ्याला सर्वपक्षीय मांदियाळींनी हजेरी लावत त्यांना शुभेच्छा दिल्या होत्या. या कार्यक्रमात शरद पवार यांचीही उपस्थिती होती. जेव्हा जेव्हा कोल्हापूरच्या पुरोगामी परंपरेला धक्का लावण्याचा प्रयत्न झाला आहे तेव्हा तेव्हा महाराज त्याचा निषेध करत महाराज अग्रभागी राहिले आहेत. राज्यसभा निवडणुकीत संभाजीराजे यांच्या उमेदवारीवरुन राजकीय वाद निर्माण झाल्यानंतर शाहू महाराज यांनी शिवसेना ठाकरे गटाची पाठराखण करताना संभाजीराजे यांना खडे बोल सुनावले होते.


शाहू महाराजांकडून भाजपवर थेट हल्लाबोल 


राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोल्हापूर जिल्हा अत्यंत संवेदनशील झाला आहे. शिवराज्याभिषेक दिनी झालेल्या प्रकारानंतर शहरात दंगल भडकल्याने पुरोगामी बाण्यालाच धक्का लागला होता. यानंतर शाहू महाराज यांनी थेट भूमिका घेताना भाजपवर सडकून टीकास्त्र सोडले होते. त्यानंतर काढण्यात आलेल्या सद्भभावना रॅलीतून समतेचा जागर करण्यात आला होता. या रॅलीचे नेतृत्व महाराजांनीच केले होते.  


कोल्हापूर टार्गेट आहे, मात्र कोल्हापूरला कोणतीही गोळी लागू शकत नाही


राज्याला पुरोगामी वारसा देणाऱ्या लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या कोल्हापूर नगरीत 7 जून रोजी झालेल्या धार्मिक दंगलीनंतर पुन्हा एकोपा नांदण्यासाठी राजर्षी शाहू सलोखा मंचकडून शाहू सद्भावना रॅली आणि सभेचे आयोजन करण्यात आले होते. रॅलीनंतर झालेल्या सभेत छत्रपती शाहू महाराज यांनी आपले परखड मत व्यक्त करताना गेल्या 100 वर्षात कोल्हापूरला डाग लागला नाही तो 7 जून रोजी लागल्याचे म्हणाले. कोल्हापूरला टार्गेट केलं आहे. मात्र, ते टार्गेट त्यांच्यासाठी कठीण आहे कोल्हापूरला कोणतीही गोळी लागणार नाही, असा निर्धार शिव शाहू सद्भावना रॅलीनंतर झालेल्या सभेत श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांनी बोलून दाखवला होता. 


महाराजांना उमेदवारी मिळाल्यास भाजपची पळापळ होणार 


कोल्हापूर आणि हातकणंगले मतदारसंघातून भाजपने चांगलीच कंबर कसली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीतून महाराज रिंगणात उतरल्यास भाजपला उमेदवार शोधण्याची वेळ येणार आहे. छत्रपती शाहू महाराजांच्या घराण्याशी कोल्हापूरकरांची जुळलेली नाळ आणि वारसा पाहता भाजपकडून विरोध झाल्यास अडचणीचा ठरु शकतो. 


इतर महत्वाच्या बातम्या