Kolhapur News : कोल्हापूर-मिरज मार्गावरील सात पॅसेंजर उद्या शुक्रवारी रद्द करण्यात आल्या आहेत. रेल्वे गुड्स मार्केट यार्डमध्ये मार्गाच्या दुरुस्तीचे काम करण्यात येणार आहे. याकरीता शुक्रवारी रेल्वेने ब्लॉक घेतला आहे. यामुळे दुपारनंतरच्या कोल्हापूर-मिरज व मिरज-कोल्हापूर मार्गावरील पॅसेंजर रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयाने या मार्गावरील नियमित प्रवाशांपैकी अनेकांना इतर वाहनांचा आधार घ्यावा लागणार आहे.
मिरजहून दुपारी कोल्हापूरकडे येण्यासाठी तिरुपती-कोल्हापूर हरिप्रिया, मुंबई-कोल्हापूर कोयना एक्स्प्रेस या गाड्या तर सांयकाळी मिरजेकडे जाण्यासाठी कोल्हापूर-मुंबई महालक्ष्मी एक्स्प्रेसमुळे प्रवाशांना काहींसा आधार मिळणार आहे. मात्र या गाड्यांसाठी जादा दराची तिकिटे घ्यावी लागणार आहेत. 4 आक्टोबरपासून रद्द केलेली कोल्हापूर-गोंदिया महाराष्ट्र एक्स्प्रेस बुधवारपासून पूर्ववत सुरू झाली आहे. दि. 20 रोजी कोल्हापूर-गोंदिया महाराष्ट्र एक्स्प्रेस दुपारी पावणे तीन ऐवजी सायंकाळी सातला सुटणार आहे. दि. 20 रोजी गोंदिया-कोल्हापूर महाराष्ट्र एक्स्प्रेस रद्द केली आहे.
नोकरी, व्यवसाय, शिक्षणासाठी नियमित प्रवास करणारे बहुतांशी प्रवाशी हे या पॅसेंजरला प्राधान्य देतात. यामुळे कोल्हापूरकडे येणार्या आणि मिरजेकडे जाणार्या या दोन्ही मार्गावर या गाड्यांना चांगली गर्दी असते. शुक्रवारी दुपारनंतरच्या गाड्या दोन्ही बाजूने रद्द केल्याने प्रवाशांचे हाल होणार आहे. दिवाळीनिमित्त अनेकांचा गांधीनगर येथे तसेच कोल्हापुरात खरेदी करून घराकडे पॅसेंजरने परतण्याचा दरवर्षीचा बेत असतो. उद्या शुक्रवारी अशा सर्वच प्रवाशांचे हाल होणार आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या