कोल्हापूर: लोकसभा निवडणुकीतील निराशानजक कामगिरीनंतर टीकेच्या केंद्रस्थानी असलेल्या अजित पवार यांना आता आणखी एक मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. अजितदादा गटातील (Ajit Pawar Camp) एक बडा नेता महाविकास आघाडीच्या वाटेवर असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत पश्चिम महाराष्ट्रात नव्या जोमाने उतरण्याच्या तयारीत असलेल्या अजित पवार यांच्या मनसुब्यांना धक्का बसू शकतो. सूत्रांच्या माहितीनुसार, कोल्हापूरमधील बिद्री कारखान्याचे अध्यक्ष आणि माजी आमदार के.पी. पाटील (K P Patil) हे महाविकास आघाडीच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. 


के.पी. पाटील यांनी अलीकडेच राज्य सरकार आणि महायुतीवर सडकून टीका केली होती. त्यांचा एकूण रागरंग पाहता ते विधानसभा निवडणुकीपूर्वी मविआ आघाडीतील एका पक्षात प्रवेश करु शकतात. कोल्हापूर जिल्ह्यात हसन मुश्रीफ यांच्यानंतर के.पी. पाटील हे अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्ह्यातील सर्वात मोठे नेते आहेत. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर के पी यांची  महाविकास आघाडीशी जवळीक वाढल्याचे सांगितले जाते. त्यामुळे आगामी काळात के पी पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्यास तो अजित पवार यांच्यासाठी मोठा धक्का ठरेल.


के.पी. पाटील 'या' कारणामुळे मविआच्या वाटेवर


के.पी. पाटील हे अजितदादांच्या नेतृत्त्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील मोठे नेते मानले जातात. मात्र, आता ते महाविकास आघाडीच्या वाटेवर आहेत. कारण राधानगरी-भुदरगड विधानसभा मतदारसंघातून शिंदे गटाचे प्रकाश आबिटकर हे आमदार आहेत. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत त्यांनाच पुन्हा एकदा संधी मिळण्याची शक्यता आहे, हे निश्चित आहे. अशावेळी आपल्याला आमदारकी लढवायची असेल तर आपल्याला मविआ आघाडीशिवाय पर्याय नाही, हे  के.पी. पाटील यांच्य लक्षात आले आहे. दोन दिवसांपूर्वीच मविआने कोल्हापूरमध्ये मोर्चा काढला होता, त्यामध्येही के.पी. पाटील सहभागी झाले होते. शाहू महाराज यांनी आभार प्रदर्शनाच्या कार्यक्रमासाठी राधानगरी-भुदरगड मतदारसंघात गेले होते, तेव्हा के.पी. पाटील यांनी शाहू महाराजांचे स्वागत केले. त्यामुळे के.पी. पाटील यांची मविआच्या दिशेने वाटचाल सुरु झाल्याचे चित्र आहे. हा अजित पवारांसाठी मोठा धक्का मानला जात आहे. 


राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली तेव्हा के.पी. पाटील यांच्या कार्यकर्त्यांचा आग्रह होता की, आपण शरद पवार यांच्यासोबत राहिले पाहिजे. मात्र, के.पी. पाटील यांनी बिद्री साखर कारखान्याच्या काही परवानग्यांसाठी आपण सत्तेसोबत जात असल्याचे त्यांनी म्हटले होते. मात्र, आता लोकसभेच्या निकालानंतर आता त्यांची पावलं पुन्हा एकदा महाविकास आघाडीच्या दिशेने पडत असल्याचे दिसत आहे. 


आणखी वाचा


आधी बळीचा बकरा बनवलं,आता अजितदादांना बाहेर पडण्यास भाग पाडायचं, हीच चाणक्यांची रणनीती, रोहित पवारांचा हल्लाबोल