Illegal Fetal Sex Determination Racket in Kolhapur: कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील बिद्रीमधील बेकायदेशीर गर्भलिंग निदान प्रकरणाची व्याप्ती वाढत चालली आहे. पोलिसांनी या प्रकरणातील डॉ. युवराज पाटीलला बेड्या ठोकल्यानंतर सहा एजंटाना देखील अटक केली. सगळ्यात धक्कादायक म्हणजे या डॉक्टराने अनेक भागात एजंटांचं जाळ पसरवून मुलीची गर्भातच हत्या केल्याचे समोर आलं आहे. इतकंच नाही तर या दुष्यकृत्यातून त्याने लाखो रुपयांची माया जमवली असल्याचे देखील पोलीस तपासात समोर येत आहे. 

Continues below advertisement

गर्भलिंग निदान प्रकरणात डॉ. युवराज पाटील आणि एजंट संभाजी शिंदे यांच्या मुसक्या आवळल्यानंतर आता आणखी सहा जणांना इस्पूर्ली पोलिसांनी अटक केली आहे.हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या मनीषा दिनकर कांबळे आणि नंदा ईश्वरा गुरव यांच्यासह एजंट बाजीराव तोकडे, विक्रम आनंदा पाटील, सुखदेव पाटील, सुनील सदाशिव गुरव यांना अटक केली आहे. या गोरखधंद्यातून डॉ. युवराज पाटीलने बेकायदेशीर गर्भलिंग निदान आणि गर्भपाताचे कृत्य करून लाखो रुपयांची माया जमवली आहे. इस्पुर्ली पोलिसांनी डॉ. युवराज पाटील मालकीच्या आलिशान फॉर्च्यूनर आणि थाररॉक्स कार जप्त केल्या आहेत. 

श्रद्धा हॉस्पिटलमध्ये राजरोस गर्भलिंग निदान 

डॉक्टर युवराज पाटील बिद्रीमधील श्रद्धा हॉस्पिटलमध्ये राजरोस गर्भलिंग निदान करत होता. हजारो रुपये घेत हॉस्पिटलमध्ये आईच्या पोटातच मुलीच्या हत्या करत गर्भपात करत होता. इस्पूर्ली पोलिसांनी या प्रकरणाच्या मुळाशी जावून तपासला सुरुवात केल्यानंतर अनेक सहभागी आरोपीची नावे समोर येत आहेत. पोलिसांनी यापूर्वी डॉ. युवराज पाटील आणि संभाजी शिंदे यांना अटक करून लाखो रुपये जप्त केले होते. आता या प्रकरणाचा तपास करत असताना आणखी सहा जणांचा सहभाग दुष्कृत्यात आढळून आला.  

Continues below advertisement

या एजंटांच्या चौकशीत अनेक धक्कादायक माहिती समोर येत आहेत. पोलिसांना एजंटांच्या मोबाईलमधील अनेकांची नावे समोर आली आहे. यामध्ये प्रामुख्याने एजंटांनी कोणामार्फत गर्भलिंग निदान करण्यासाठी डॉ. युवराज पाटीलकडे पेशंट आले, त्यांच्याकडून किती रुपये मिळाले याची सर्व माहिती असणारे डिजिटल पुरावे उपलब्ध झाले आहेत. पोलिसांनी आतापर्यंत युवराज पाटीलवर गर्भलिंग निदान केल्याचा गुन्हा दाखल केला होता, पण आता नव्याने बेकायदेशीर गर्भपात केल्या प्रकरणी अधिकचा गुन्हा दाखल होणार आहे आहे. 

भ्रूणाची विल्हेवाट लावण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था 

या संपूर्ण रॅकेटमध्ये गर्भपातानंतर भ्रूणाची विल्हेवाट लावण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली होती. डॉ. युवराज पाटील हा गर्भपात केल्यानंतर काही ठराविक महिलांच्या माध्यमातून हे भ्रूण नष्ट करत असल्याची माहिती तपासात पुढे आली आहे. या कामासाठी संबंधित महिलांना प्रत्येकी ठराविक रक्कम दिली जात होती. त्यामुळे पोलीस गर्भपात केलेले भ्रूण नेमके कुठे टाकले गेले किंवा कुठे पुरले गेले याचा शोध पोलिसांनी सुरू केला आहे.

इतर महत्वाच्या बातम्या