कोल्हापूर : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीमध्ये जागावाटपावरून कोणताही वाद नसल्याचा दावा काँग्रेसचे विधानपरिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांनी केला आहे. लोकसभेसाठी तिन्ही पक्ष तयारी करत आहेत. तिन्ही पक्षांकडून 48 जागांवर चाचपणी केली जात असल्याचे पाटील म्हणाले. सतेज पाटील म्हणाले की, लोकसभेसाठी तिन्ही पक्ष तयारी करत आहेत. ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात लोकसभेचा फॉर्म्युला ठरणार आहे. जागावाटपाच्या मुद्द्यावरून राज्यात कोणताही वाद राहणार नाही. महाविकास आघाडीचे 40 खासदार कसे निवडून येतील यासाठी आमचा प्रयत्न आहे. 


शरद पवारांच्या दौऱ्यावर काय म्हणाले? 


दरम्यान, शरद पवार यांची 25 ऑगस्ट रोजी कोल्हापुरात सभा होत आहे. या पार्श्वभूमीवर बोलताना त्यांनी सांगितले की, 25 ऑगस्टला कोल्हापुरात आल्यानंतर आम्ही महाविकास आघाडी म्हणून त्यांचे उत्साहात स्वागत करणार आहे. कोल्हापूरकरांचे नेहमीच त्यांच्यावर प्रेम राहिले आहे. 


कधी काय होईल हे सांगता येत नाही


मुख्यमंत्री बदलावरून चर्चा होत असल्याने कधी काय होईल हे सांगता येत नसल्याचे सतेज पाटील म्हणाले. याचा परिणाम प्रशासनावर झाला आहे. लोकांची कामे होतं नाहीत. नेमकी सत्ता कोणाची हा प्रश्न निर्माण झाला आहे. आता कोण जेवायला जातं, कोण जातं नाही याचा डायरेक्ट परिणाम विकासावर होत आहे. 


अशोक चव्हाणांनी वस्तूस्थिती मांडली 


अशोक चव्हाण यांनी 50 टक्क्यांची अट शिथिल केल्याशिवाय आरक्षण शक्य नसल्याची प्रतिक्रिया कोल्हापूर दौऱ्यात दिली होती. 50 टक्क्यांचा मुद्दा बदलून आरक्षण देता येईल, असं चव्हाण म्हणाले आहेत. हा तिढा केंद्राने सोडवावा एवढंच चव्हाण बोलले आहेत, यामध्ये कोणतेही राजकारण नाही. त्यांनी वस्तुस्थिती मांडल्याचे त्यांनी सांगितले. 


कोल्हापूरच्या फोटोग्राफीला ऐतिहासिक महत्त्व


दरम्यान, कोल्हापूर प्रेस क्लब व प्रेस फोटोग्राफर यांच्या वतीने जागतिक छायाचित्र दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात बोलताना सतेज पाटील म्हणाले की, छायाचित्रकारांनी जबाबदारीने फोटो काढले पाहिजे. कोल्हापूरच्या फोटोग्राफीला ऐतिहासिक महत्त्व आहे. जनतेसमोर खरं चित्र आणणं खूप गरजेचं आहे. भविष्यातील गुण आणि दुर्गुण काय असतील हे दाखवलं पाहिजे. पत्रकारितेमध्ये छायाचित्रकारांना देखील आता तितकेच महत्त्व आहे. फोटोग्राफीला कोणती भाषा नाही, कोणती जात नाही, कोणता धर्म नाही. एक सुंदर फोटो टिपण्यासाठी होणारी धडपड पाहायला मिळते, छायाचित्रकारांमधील जी स्पर्धा आहे ती चांगली स्पर्धा आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या