Satej Patil on Election Commission: राज्यात एक कोटींपेक्षा अधिक नावे मतदार यादीतील बाजूला जातील. निवडणूक आयोगाने ठरवल्यास 48 तासात ही दुबार नावं मतदार यादीतून कमी होऊ शकतात, असा मोठा दावा काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते तथा कोल्हापूर काँग्रेस जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील यांनी केला. आज कोल्हापूरमध्ये बोलताना पाटील यांनी निवडणूक आयोगाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. पाटील म्हणाले की इलेक्शन मॅन्युअलमध्ये स्पष्ट सूचना आहेत दुबार मतदार असतील तर ते कोणत्या पद्धतीने काढले पाहिजेत. केंद्रीय निवडणूक आयोगाचे वेगळं सांगतात, तर राज्य निवडणूक आयोग मॅन्युअल वेगळं सांगत आहे. त्यामुळे एकूणच संभ्रमावस्था निर्माण करायची असल्याचे ते म्हणाले.

Continues below advertisement


तर निवडणूक आयोगाला अधिकृत काढायला काय अडचण?


सतेज पाटील यांनी सांगितले की, राज्यामध्ये किमान एक कोटीपेक्षा अधिक नावे मतदार यादीतून बाजूला होतील. त्यामुळे मतदार बूथवरील लोड कमी होईल आणि यंत्रणा सुद्धा कमी लागेल. जर राजकीय पक्ष राज्यातील दुबार नावे शोधून काढत असेल, तर निवडणूक आयोगाला अधिकृत काढायला काय अडचण आहे अशी विचारणा त्यांनी केली. एखादा निवडणुकीत पडलेला किंवा निवडून आलेला उमेदवारही तुम्ही दिलेल्या डाटावरूनच संपूर्ण माहिती काढत असतो, तर मग आम्ही काढत असेल तर तुम्हाला का जमत नाही? अशी विचारणा त्यांनी केला. ते म्हणाले की निवडणूक आयोगाने जर ठरवलं तर 48 तासात दुबार मतदार यादीतून कमी होऊ शकतात. 


कोल्हापुरातील खड्डे भरण्यासाठी 50 कोटींचा निधी द्यावा


दरम्यान, कोल्हापुरातील खराब रस्त्यांविरोधात कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये याचिका दाखल करण्यात आली आहे. याचिकेच्या  पार्श्वभूमीवर बोलताना पाटील म्हणाले की कोल्हापूरमधून सर्वाधिक टॅक्स जातो. महाराष्ट्रात तिजोरीत कोल्हापूरकरांचा सिंहाचा वाटा आहे. कोल्हापूरमध्ये शंभर कोटीचे रस्ते आले ते सुद्धा व्यवस्थित करण्यात आले नाहीत. कोल्हापुरातील खड्डे भरण्यासाठी शासनाने तत्काळ 50 कोटी रुपयांचा निधी द्यावा, अशी मागणी पाटील यांनी केली. 50 कोटी मुख्यमंत्र्यांनी द्यावेत आणि त्यांचा एक माणूस खड्डे भरले की नाही ते तपासण्यासाठी पाठवावा. इथं काय होते या अखंड कोल्हापूरला माहिती असल्याचा टोला सुद्धा त्यांनी लगावला.


वाद निर्माण करून निवडणूका जिंकायच्या


दरम्यान, ओबीसी मेळाव्यावर बोलताना ते म्हणाले की सरकारमध्ये एकाने एक बाजू घ्यायची आणि दुसऱ्या दुसरी बाजू घ्यायची असं एकंदरीत चाललं आहे. मुख्यमंत्र्यांनी दोघांनाही कामाला लावलेलं आहे. या गोष्टी मुख्यमंत्र्यांना न सांगता होत आहेत का? अशी शंका त्यांनी व्यक्त केली. ते म्हणाले की भुजबळ आणि विखे पाटील हे मुख्यमंत्र्यांच्या कानावर गोष्टी न घालता करत आहेत का? तुम्ही एक पार्टी सांभाळा, मी एक पार्टी सांभाळतो, दोन्ही पार्ट्यांनी आम्हाला सहकार्य करावं असा हा अजेंडा असल्याचा आरोप पाटील यांनी केला. दोन समाजामध्ये भाजप आणि महायुतीकडून भांडण लावण्याचा प्रयत्न सातत्याने होत असल्याचे ते म्हणाले. हैदराबाद गॅजेटसंदर्भात जीआर काढल्यानंतर ओबीसींवर अन्याय होणार नाही असं म्हणायचं आणि दुसऱ्या बाजूला वेगळं वक्तव्ये करायची हा महायुतीमधील गोंधळाची अवस्था असल्याचे ते म्हणाले. वाद निर्माण करून निवडणूका जिंकायच्या असल्याचा आरोप त्यांनी केला. 


इतर महत्वाच्या बातम्या