कोल्हापूर : हातकणंगले लोकसभा मतदारसंघांमध्ये मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागल्यानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी महाविकास आघाडीने विश्वासघात केल्याचा आरोप केला आहे. आता या आरोपांवर काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. 


त्यांना फक्त शिवसेनेचा पाठिंबा होता


राजू शेट्टी यांनी केलेल्या विश्वासघाताच्या आरोपावर बोलताना सतेज पाटील यांनी स्पष्टीकरण दिले. ते म्हणाले की, लोकसभा निवडणुकीसाठी राजू शेट्टी आमच्यासोबत यावेत यासाठी मी पहिल्यापासून प्रयत्न करत होतो. मात्र, त्यांना फक्त शिवसेनेचा पाठिंबा होता. बाकीच्या पक्षाचे ते बोलत नव्हते, असा दावा त्यांनी केला. शेट्टी यांची कोणतीही फसवणूक झालेली नाही. मी शेवटपर्यंत सोबत राहावे यासाठी प्रयत्न केल्याचे पाटील यांनी सांगितले. 


जयंत पाटील आणि काँग्रेस नेत्यांमध्ये काही गैरसमज 


हातकणंगले आणि सांगली लोकसभा मतदारसंघांमध्ये वाद लागण्यामागे जयंत पाटील यांचा हात असल्याचा आरोप लोकसभा निवडणुकीपूर्वीपासूनच होत आहे. सांगलीमध्ये विशाल पाटील यांनी अपक्ष म्हणून विजय मिळवल्यानंतर विशाल पाटील आणि त्यांच्या प्रचार मोहिमेची धुरा सांभाळणारे आमदार विश्वजित कदम यांनी नाव न घेता जयंत पाटील यांच्यावर तोफ डागली आहे. या पार्श्वभूमीवर सतेज पाटील यांनी सांगलीमध्ये जयंत पाटील आणि काँग्रेस नेत्यांमध्ये काही गैरसमज आहेत ते लवकरच मिटतील, असा विश्वास व्यक्त केला.


कोणताही जागावाटपाचा फॉर्म्युला ठरलेला नाही


पाटील यांनी आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जागावाटपांवर भाष्य केले. येणाऱ्या विधानसभेमध्ये नवीन टीम दिसेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. विधानसभेच्या संदर्भाने अद्याप कोणताही जागावाटपाचा फॉर्म्युला ठरलेला नाही. निर्णय राज्य पातळीवर घेतला जाईल. कोल्हापुरात काय फॉर्म्युला असेल हे देखील ठरलं नसल्याचे पाटील यांनी यावेळी सांगितले. 


काय म्हणाले होते राजू शेट्टी?


दरम्यान, राजू शेट्टी यांनी हातकणंगलेमधील पराभवानंतर महाविकास आघाडीवर विश्वासघात केल्याचा आरोप केला होता. ते म्हणाले होते की, मला तेव्हा सागण्यात आलं की, आम्ही तुम्हाला पाठिंबा दिल्यानंतर, तसेच निवडून आल्यानंतर काय भूमिका घेणार? याबाबत ड्राप्ट तयार करण्यात आला होता. जयंत पाटील आणि सतेज पाटील यांनी तो ड्राप्ट तयार केला होता. मात्र, नंतर त्यांनी त्यांचा उमेदवार जाहीर केला. गेल्या सहा महिन्यांपासून ही जागा आम्हाला सोडल्याचे सांगत होते. मी उद्धव ठाकरे यांना दोनदा भेटलो. सतेज पाटील यांना भेटलो. शरद पवार यांच्याबरोबरही मी फोनवरून चर्चा केली. मात्र, सर्वांनी मिळून शेवटी जे करायचं तेच केलं, आरोप केला होता. 


इतर महत्वाच्या बातम्या