कोल्हापूर : लोकसभा निवडणुकीआधी (Loksabha Election) कोल्हापूरमध्ये (Kolhapur) दंगली घडवल्या गेल्या, त्याच पद्धतीने विधानसभा निवडणुकीआधी कोल्हापुरात वातावरण बिघडवायचं आहे का? असा गंभीर आरोप काँग्रेस जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील (Satej Patil) यांनी केला. गेल्या काही दिवसांपासून कोल्हापूरमधील कायदा आणि सुव्यवस्था ढासळल्याचा आरोपही त्यांनी केला.  


कोल्हापूरची शांतता बिघडावी यासाठी काही घटक प्रयत्न करत आहेत


सतेज पाटील म्हणाले की, निवडणुकीआधी कोल्हापुरात दंगली झाल्या. आता काही लोक येऊन पुन्हा प्रक्षोभक भाषण करत आहेत. गेल्या सहा महिन्यांपासून कोल्हापूरची शांतता बिघडावी यासाठी काही घटक प्रयत्न करत आहेत, असा दावा त्यांनी केला. पोलिसांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करावी, अशी मागणी सुद्धा त्यांनी केली. 


काही दिवसांपूर्वी विश्व हिंदू सभेच्या संमेलनात संघटन मंत्री मिलिंद परांडे यांनी कोल्हापूर सहपरिसरामध्ये जबरदस्तीने धर्मांतर होत असल्याचा दावा केला होता. परांडे या वक्तव्याचा कोल्हापुरात पुरोगामी संघटनांच्या प्रतिनिधींनी विरोध केला होता. जबरदस्तीने धर्मांतर होत असेल, तर संबंधितांवर कारवाई करा. अन्यथा, कोल्हापूर बदनामी करणाऱ्या आणि द्वेष पसरवणाऱ्या मिलिंद परांडे यांच्यावर कारवाई करा, अशी मागणी त्यांनी केली. 


दरम्यान, कोल्हापुरात प्रस्तावित असलेल्या शक्तीपीठ महामार्ग विरोधात रणकंदन सुरु आहे. जिल्ह्यात बाधित होणाऱ्या शेकडो शेतकऱ्यांनी शक्तीपीठ महामार्गाला थेट विरोध केला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील महाविकास आघाडी आणि महायुतीमधील नेत्यांकडूनही महामार्गाला विरोध सुरु आहे. या सर्व पार्श्वभूमीवर उद्या (18 जून) कोल्हापूरमध्ये दसरा चौक ते  जिल्हाधिकारी कार्यालय असा विराट मोर्चा शक्तिपीठ महामार्ग विरोधात काढण्यात येणार आहे.


उद्याचा मोर्चा मोठ्या शक्तीने काढणार


या सर्व पार्श्वभूमीवर सतेज पाटील यांनी भाजपवर तोफ डागली. ते म्हणाले की, भाजपने या संदर्भातील भूमिका घेतलेली नाही. महायुतीमधील दोन घटक पक्षांनी आपली भूमिका स्पष्ट केली असली, तरी भाजपने अद्याप भूमिका जाहीर केलेली नाही. महायुतीमधील राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना शिंदे गटाला किती किंमत आहे हे कळत असल्याचा टोलाही त्यांनी यावेळी लगावला. कंत्राटदारांसाठीच शक्तिपीठ महामार्ग होत असल्याचा आरोप सुद्धा त्यांनी केला. उद्याचा मोर्चा मोठ्या शक्तीने काढणार असल्याचे त्यांनी सांगितले. केंद्राने सूचना दिल्या असल्याने महाराष्ट्र सरकार महामार्ग करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप सुद्धा त्यांनी केला. 


कोल्हापुरात कायदा आणि सुव्यवस्था ढासळली


दरम्यान, यावेळी त्यांनी कळंबा जेलमध्ये सुरू असलेल्या घडामोडींवरील भाष्य केले. जेलमध्येच कैद्यांचे खून होत आहेत. या पार्श्वभूमीवर बोलताना पाटील यांनी सांगितले की, कोल्हापूरमध्ये कायद्या आणि सुव्यवस्था पूर्णत: ढासळली आहे. अशी अनेक प्रकरणे समोर आली आहेत. पोलीस यंत्रणा राजकीय यंत्रणेत अडकल्याचे दिसून येत आहे. दर दोन दिवसाला एक खून कोल्हापुरात होत आहे, तर कळंबा कारागृहात दोन दिवसाला नवनवीन गोष्टी सापडत आहेत, याकडे पोलिस प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोपही त्यांनी केला.


इतर महत्वाच्या बातम्या