लातूर : माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे दिग्गज नेते विलासराव देशमुख यांच्या लातूरनजीकच्या निवळीमध्ये पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरण प्रसंगी जशी रितेश देशमुखची भावनिक किनार लाभली त्याच पद्धतीने काँग्रेस नेत्यांच्या राजकीय फटकेबाजीची चर्चा रंगली. प्रमुख नेत्यांनी पक्ष पुन्हा सत्तेत आणण्याचा निर्धार यावेळी व्यक्त केला. कार्यक्रमाला प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, आमदार सतेज पाटील यांच्यासह अनेक नेते, देशमुख कुटुंबीय उपस्थित होते. माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्यापासून प्रेरणा घेत काँग्रेस पक्ष एकसंध आहे. सर्वसामान्यांचा विश्वास असलेली काँग्रेस पुन्हा सत्तेत येईल. काँग्रेस पक्षाला कोणीही संपवू शकत नाही, असा विश्वास काँग्रेस नेत्यांनी व्यक्त केला. यावेळी बोलताना सतेज पाटील यांनी सुद्धा चांगलीच फटकेबाजी केली.
सगळं संपलेलं नाही, काँग्रेस अजून जिवंत!
यावेळी बोलताना आमदार सतेज पाटील यांनी विलासरावांनी 2004 मध्ये अपक्ष म्हणून निवडणुकीला उभं राहिल्यानंतर केलेली मदत ते आज संकटात सापडलेल्या उर्जितावस्था देण्यापर्यंत भाष्य केले. सगळं संपलेलं नाही, काँग्रेस अजून जिवंत असल्याचेही ते यावेळी म्हणाले. सगळं संपलेलं नाही, काँग्रेस अजून जिवंत असल्याची दाखवण्याची जबाबदारी तरुणांची असल्याचे सतेज पाटील म्हणाले.
सतेज पाटील काय म्हणाले?
पहिल्यांदा 2004 मध्ये निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यानंतर विलासराव यांनी केलेल्या मदतीची प्रसंग सतेज पाटील यांनी यावेळी सांगितला. ते म्हणाले की, मला देखील अनेकदा मदतीचा विलासरावांचा हात राहिला. राजकारणामध्ये कशा पद्धतीने मदत करायची हे कुणाकडून शिकायचं असेल तर ते आदरणीय देशमुख साहेबांकडून शिकलं पाहिजे.
ते पुढे म्हणाले की, मला 2004 मध्ये तिकीट मिळालं नव्हतं. अपक्ष म्हणून मी निवडणुकीला उभा होतो. करवीर मतदारसंघातून पहिल्यांदा आमदार झालो आणि देशमुख साहेबांची सभा त्यावेळी कोल्हापूरमध्ये पीएन साहेबांनी घेतली होती. मी खानविलकर साहेबांविरोधात उभा होतो. आणि मला खानविलकर साहेबांच्या सभेला देशमुख साहेब येतील, याची मला खात्री होती.
मी साहेबांना म्हटलं साहेब मी अपक्ष उभा आहे. साहेब म्हणाले की, आघाडीच्या वादात तुझ्या तिकिटाचं काय जमलं नाही. म्हणाले काय करायचं? मला मी म्हटलं, सभेला फक्त येऊ नका. ते म्हणाले, आघाडी धर्म आहे, यावं लागेल. तर मी म्हणालो, मी नियोजन करतो. पी. एन. पाटील यांची सभा आठ वाजता ठेवली. साहेब परत जाताना फोन केला आणि म्हणाले, बंटी मी तुझ्याकडे आलो. नाही एवढं प्रेम त्या माणसाला माझ्यासारख्या कार्यकर्त्याला त्या ठिकाणी दिलं. त्या प्रेमाची विश्वासार्हता किती होती हे आम्ही देखील जपण्याचं काम केलं.
2004 मध्ये निकाल लागला. उल्हासदादा साक्षीला आहेत. त्या ठिकाणी चर्चा चालू होती मी अपक्षपणे निवडून आलो होतो बंटीला फोन करा, काय करणार आहे? निर्णय काय घेणार? अशी चर्चा उल्हास दादा आणि सगळी मंडळी करत होते. देशमुख साहेब उल्हास दादांना म्हणाले तुम्ही काळजी करू नका, निकाल आज लागलाय, उद्या सकाळी तो इथं असेल आणि मी तेवढा विश्वास त्या नेतृत्वाचा होता. त्यानंतर त्यांची भेट घेत घेतली, त्यांनी पाठिंबा द्यायला सांगितला.
इतर महत्वाच्या बातम्या