Accident : सातारा जिल्ह्यातील (Satara News) कराड चांदोली राज्य मार्गावरील लोहारवाडी येणपे गावच्या हद्दीत ऊस वाहतूक करणारा रिकामा ट्रॅक्टर व रिक्षाची समोरासमोर जोरदार धडक होऊन या अपघातात एकाच कुटुंबातील तिघे जागीच ठार झाल्याची घटना घडली. या भीषण अपघातात मुलगा गंभीर जखमी झाला आहे. सर्व मृत कोल्हापूर जिल्ह्यातील (Kolhapur) शाहूवाडी तालुक्यातील (Shahuwadi) पणुंद्रे गावचे आहेत. गावच्या यात्रेसाठी पुण्याहून कोल्हापूरला येत असताना त्यांच्यावर काळाने घाला घातला. मृतांमध्ये पती-पत्नी आणि मुलीचा समावेश असून मुलगा जखमी झाला आहे.  


गावाकडे यात्रेला जाताना काळाचा घाला 


गावच्या यात्रेसाठी पुण्यावरून रिक्षाने निघाले असता शनिवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास अपघात झाला. यामध्ये रिक्षाचालक सुरेश सखाराम म्हारुगडे (वय 39), पत्नी सुवर्णा सुरेश म्हारुगडे (वय 32) आणि मुलगी समीक्षा सुरेश म्हारुगडे अशी अपघातात जागीच ठार झालेल्यांची नावे आहेत. मुलगा समर्थ म्हारुगडे (सर्वजण रा. पुणे मुळगाव पणुंद्रे ता. शाहूवाडी जिल्हा कोल्हापूर) हा अपघात गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 


अपघातात रिक्षाचा चक्काचूर


याबाबत घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार सुरेश हे कुटुंबीयांसह पुणे येथे स्थायिक आहेत. ते रिक्षाचा व्यवसाय करतात. रविवारपासून सुरू होत असलेल्या जुगाई देवीच्या यात्रेसाठी ते पत्नी मुलगा व मुलगीसह रिक्षाने मूळगावी कोल्हापूरच्या दिशेने येत होते. शनिवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास कराड चांदोली राज्य मार्गावर लोहारवाडी गावच्या हद्दीत ऊस खाली करून कराडकडे निघालेल्या ट्रॅक्टर व पुण्याहून शाहूवाडीकडे जाणारी रिक्षा यांची समोरासमोर धडक झाली. ही धडक इतकी भीषण होती की ट्रॅक्टरच्या पुढील मोठ्या चाकाला धडकून रिक्षा पाठीमागील ट्रॉलीच्या खाली गेली. या अपघातात रिक्षाचा चक्काचूर झाला. रिक्षाचालक सुरेश यांच्यासह पत्नी आणि मुलीचा जागीच मृत्यू झाला. 


रिक्षा कापून मृतदेह काढला 


रिक्षाची अवस्था अपघातानंतर भीषण झाल्याने सुरेश यांचा मृतदेह रिक्षा तोडून बाहेर काढावा लागला. या अपघातानंतर ट्रॅक्टरचालक फरार झाला आहे. त्यामुळे अपघातात वेगामुळे झाला की अन्य कशामुळे याबाबत माहिती मिळाली नाही. दोन्ही वाहनांच्या अतिवेगाने अपघात झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या