Hasan Mushrif ED Raid : माजी कामगार मंत्री आणि कोल्हापूर (Kolhapur) जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे मातब्बर नेते आमदार हसन मुश्रीफ यांच्यावर आज कागलमध्ये तिसऱ्यांदा छापेमारी केली. त्यामुळे हसन मुश्रीफ अडचणीत आले आहेत का? अशी चर्चा रंगली आहे. आज कागलमधील निवासस्थानी मुश्रीफ यांच्या कुटुबीयांची साडे नऊ तास कसून चौकशी करण्यात आली. सायंकाळी 4 वाजून 35 मिनिटांनी ईडीचे पथक मुश्रीफांच्या घरातून बाहेर पडले. 


सलग होत असलेल्या चौकशीमुळे कुटुंबीय त्रस्त होऊन गेले आहेत. सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखाना,  अप्पासाहेब नलवडे साखर कारखाना कर्ज प्रकरणात ईडीकडून मुश्रीफांच्या कुटुबीयांची चौकशी सुरु आहे. आतापर्यंत मुश्रीफांची थेट चौकशी झालेली नाही. दोनवेळा ते घरी नसतानाच ईडीकडून छापेमारी झाली आहे. आतापर्यंत मुश्रीफांविरोधात ईडीकडून 35 कोटींच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात गुन्हा दाखल झाला आहे. तसेच मुरगूडमध्ये 40 कोटींच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. या गुन्ह्यात त्यांना मुंबई उच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे. 


काल (11 मार्च) न्यायालयाकडून दिलासा मिळाला असतानाच अवघ्या काही तासांमध्येच आज सकाळी ईडीचे पथक सकाळी सातच्या सुमारास मुश्रीफांच्या निवासस्थानी येऊन धडकले. तब्बल साडे नऊ तास ईडीचा फौजफाटा मुश्रीफांच्या घरी तळ ठोकून होता. यावेळी त्यांनी कुटुबीयांचे जबाब नोंदवून घेण्यासाठी प्रिंटर सोबत आणला होता. यावेळी मुश्रीफ यांच्या पत्नी, दोन मुले आणि नातवंडे उपस्थित होती. कालही (11 मार्च) ईडीकडून मुश्रीफांशी संबंधित छापेमारी करण्यात आल्याचे वृत्त 'एएनआय'कडून देण्यात आले होते. 


कार्यकर्त्यांचा ठिय्या मांडून आक्रोश 


मुश्रीफांवर ईडी कारवाई झाल्याचे समजताच कार्यकर्ते, समर्थक जमण्यास सुरुवात झाली. पोलिसांना कारवाईचा कोणताच सुगावा तब्बल तासभरानंतर फौजफाटा दाखल झाला. तोपर्यंत मुश्रीफ यांच्या घरासमोर कार्यकर्त्यांनी ठिय्या मांडून आक्रोश सुरु केला होता. त्यांना बाजूला करण्यासाठी पोलिसांना चांगलीच कसरत करावी लागली. हा राडा सुरु असताना एका कार्यकर्त्याने डोकं आपटून फोडून घेतलं. त्यामुळे कागलमध्ये चांगलाच तणाव निर्माण झाला. 


1 फेब्रुवारीला जिल्हा बँकेत छापेमारीत काय झालं?


यापूर्वी मुश्रीफ यांच्या ताब्यात असलेल्या कोल्हापूर जिल्हा बँकेत ईडीने आज (ED) छापेमारी केली होती. तसेच सेनापती कापशी आणि हरळी शाखेवरही छापेमारी केली होती. तब्बल 30 तास झाडाझडती केल्यानंतर बँकेच्या पाच अधिकाऱ्यांना ताब्यात घेण्यात आले होते. त्यांना मुंबईला नेऊन चौकशी केल्यानंतर 70 तासांनी सुटका करण्यात आली होती. 


11 जानेवारी रोजी छापेमारीत काय झालं?


11 जानेवारी रोजी आमदार हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांचे निवासस्थान, त्यांचे निकटवर्तीय माजी नगराध्यक्ष प्रकाश गाडेकर यांचे निवासस्थान, सरसेनापती संताजी घोरपडे कारखाना या ठिकाणी छापेमारी केली होती. या तीन ठिकाणांसह मुश्रीफ यांच्या कन्येच्या कोल्हापुरातील सासणे मैदान परिसरातील घरावरही छापा टाकण्यात आला होता. तसेच 11 जानेवारी रोजीच ईडीने पुण्यामध्येही हसन मुश्रीफ यांच्याशी संबंधित चार ठिकाणी छापे टाकले होते. शिवाजीनगर येथील ई-स्क्वेअर समोर पेट्रोल पंपाच्या मागे इमारतीमधील कार्यालय, हडपसर आणि कोंढवा भागातील अशोका म्जुज सोसायटीत मुश्रीफ यांचे नातेवाईक, तसेच साऊथ मेन रोड-कोरेगाव पार्कमध्ये राहणारे व्यावसायिक भागीदार यांच्यावर छाप्याची कारवाई केली होती. 


मुश्रीफांच्या छापेमारीवर ईडीचा दावा काय?


मुश्रीफ यांच्यावर झालेल्या कथित आरोपांममध्ये ईडीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मुश्रीफ आणि त्यांच्या निकटवर्तीयांनी 15 वर्षांपूर्वी बंद झालेल्या कंपनीच्या खात्यात 50 कोटी कॅश भरले होते. ते पैसे साखर कारखान्याच्या खात्यात वळवले होते. तसेच कोलकात्यातील काही शेल कंपन्यांचा वापर करुन काळा पैसा आपल्या खात्यात वळल्याचा आरोप ईडीने केला आहे. त्या कंपन्यांचे कनेक्शन हसन मुश्रीफ आणि त्यांच्या संबंधित असलेल्या साखर कारखान्यांशी जोडलं जात आहे. रजत प्रायव्हेट लिमिटेड, माऊंट कॅपिटल लिमिटेड या दोन्ही कंपन्या बंद पडल्या आहेत. जवळपास 15 वर्षापूर्वी या कंपन्या बंद पडल्या होत्या. या कंपन्यांमध्ये हसन मुश्रीफ आणि त्यांच्या निकटवर्तीयांनी 50 कोटी रुपयांची रक्कम भरल्याची माहिती ईडीच्या सुत्रांनी दिली आहे. ही रक्कम साखर कारखान्यामध्ये गुंतवल्याची माहिती मिळत आहे.    


इतर महत्वाच्या बातम्या