कोल्हापूर : आतापर्यंत कर्तव्यदक्ष अशी ओळख असलेल्या कोल्हापूरच्या पोलिस दलावर आता डाग लागला आहे. ऑलिम्पिक पदक विजेता स्वप्नील कुसाळेच्या स्वागतयात्रेत कोल्हापूर पोलिसांची मुजोरी दिसून आली. एबीपी माझाचे कॅमेरामन निलेश शेवाळे यांना पोलिसांनी धक्काबुक्की केल्याचा प्रकार घडला. त्याचवेळी जिल्हा पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांनीही अरेरावी करत धक्काबुक्की केल्याची घटना घडली. जिल्हा पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्या या कृत्याचा कोल्हापूर प्रेसकडून निषेध नोंदवण्यात आला आहे. 


ऑलिम्पिक ब्राँझ मेडलिस्ट स्वप्निल कुसाळे याच्या स्वागतासाठी कोल्हापुरात स्वागत रॅली आयोजित करण्यात आली होती. या स्वागत रॅलीमधे एबीपी माझाच्या कॅमेरामनला पोलिसांनी धक्काबुक्की केली. त्याचवेळी जिल्हा पोलिस प्रमुखांनी एबीपी माझाचे कॅमेरामन निलेश शेवाळे यांना अरेरावी करत धक्काबुक्की केली. 


नेमकं काय घडलं? 


कोल्हापूरचा सुपुत्र स्वप्नील कुसाळेने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकल्यानंतर त्याच्या स्वागतासाठी कोल्हापुरात रॅली काढण्यात आली होती. यावेळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. याच रॅलीचे वार्तांकन करण्यासाठी पत्रकार त्या ठिकाणी गेले होते. त्यावेळी पोलिसांनी अनेक पत्रकारांना धक्काबुक्की केल्याचा प्रकार घडला. 


एबीपी माझाचे कॅमेरामन निलेश शेवाळे हे लाईव्ह करत असताना एका गार्डने त्यांची बॅग खेचण्याचा प्रकार घडला. त्यावेळी बॅग खेचू नये अन्यथा लाईव्ह बंद पडेल असं कॅमेरामन निलेश शेवाळे याने विनंती केली. त्यावेळी पोलिसांनी त्याच्याशी धक्काबुक्की केली. पोलिस अधीक्षक महेंद्र पंडितही त्या ठिकाणी आले आणि त्यांनीही कॅमेरामनला अरेरावी केली नंतर त्यांनी धक्काबुक्कीही केली. 


प्रेस क्लबच्या वतीने निषेध


कोल्हापूर पोलिसांच्या या अरेरावीचा प्रेस क्लबच्या वतीने निषेध नोंदवण्यात आला आहे. गेल्या 25-30 वर्षांपासून आपण पत्रकारिता करत असून असा अनुभव आला नसल्याचं प्रेस क्लबचे अध्यक्ष म्हणाले. चांगल्या कार्यक्रमाला जाणूनबूजून गालबोट लावण्याचा प्रकार असल्याचंही ते म्हणाले. 


पालकमंत्र्यांकडे तक्रार


पोलिस अधीक्षकांनी अरेरावी केल्यानंतर सर्व पत्रकारांनी त्यांची तक्रार पालकमंत्र्यांकडे केली. त्याचसोबत काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांच्याकडेही तक्रार करण्यात आली. सतेज पाटलांनी पोलिसांना जाब विचारल्यानंतर, आपल्या गार्डच्या कॉलरला पत्रकाराने हात घातल्याने ही घटना घडल्याचं पोलिस अधीक्षकांनी सांगितलं. मात्र तशा पद्धतीची कोणतीही घटना घडली नसून त्या घटनेचे शुटिंग उपलब्ध असल्याचं पत्रकारांनी स्पष्ट केलं. तसं जर घडलं असेल तर सर्व पत्रकार पोलिसांची माफी मागतील असंही सांगितलं. मात्र त्यानंतर पोलिस अधीक्षक काहीही बोलले नाहीत.