Samarjeetsinh Ghatge Vs Hasan Mushrif : कोणत्याही परिस्थितीत कोल्हापूर जिल्ह्यातील (Kolhapur Vidhan Sabha) कागल (Kagal Vidhan Sabha) विधानसभेचं (Maharashtra Vidhan Sabha) रण जिंकण्यासाठी कंबर कसलेल्या भाजप नेते समरजिसिंह घाटगे (Samarjeetsinh Ghatge) यांच्या समोरीतील अडचणी वाढत चालल्या आहेत. पहिल्यांदा माजी आमदार संजय बाबा घाटगे यांनी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांना कागल विधानसभेला माघार घेत जाहीर पाठिंबा दिल्यानंतर आता अप्रत्यक्षरित्या माजी खासदार संजय मंडलिक यांनी सुद्धा हसन मुश्रीफ यांना पाठिंबा जाहीर केला आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीमध्ये मंडलिक गट आणि संजय बाबा घाटगे गट हे हसन मुश्रीफ यांच्यासोबतच राहणार असल्याचे जवळपास शिक्कामोर्तब झालं आहे. त्यामुळे समरजित घाटगे यांना आता कागलच्या रणांगणामध्ये एकाकी झुंज द्यावी लागणार आहे. 


संजय मंडलिकांचा हसन मुश्रीफांना पाठिंबा


गेल्या काही दिवसांपासून संजय मंडलिक हे कोणती भूमिका घेणार? याची चर्चा कागलच्या राजकारणामध्ये सुरू होती. लोकसभा निवडणुकीमध्ये संजय मंडलिक यांना हसन मुश्रीफ आणि घाटगे गटाकडून सुद्धा अपेक्षित मदत झाली नसल्याचा आरोप सातत्याने त्यांच्या कार्यकर्त्यांमधून होत होता. त्यामुळे आगामी विधानसभेला संजय मंडलिक कोणती भूमिका घेणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिलं होतं. मात्र, आता बिद्रीमधील जाहीर व्यासपीठावरूनच संजय मंडलिक यांनी सर्व चर्चांना पूर्णविराम देत हसन मुश्रीफ यांना पाठिंबा जाहीर केला आहे. त्यामुळे हसन मुश्रीफ यांचं कागलसाठी पारडं आणखी मजबूत झालं आहे.


हसन मुश्रीफ यांना कागलमधून उमेदवारी जाहीर


मागील रविवारी झालेल्या कागलमधील विकास कामांच्या लोकार्पण सोहळ्यामध्येच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कागलमधून मुश्रीफ यांची उमेदवारी जाहीर करून टाकली होती. इतकी मते द्या की विरोधकांना धडकी भरली पाहिजे असेही त्यांनी सांगितले होते. त्यामुळे आता कागलच्या राजकारणामधील जे गटातटाच राजकारण आहे त्याच्यामध्ये आता दोन गटांची भूमिका निश्चित झाल्याने समरजितसिंह घाटगे आता कोणती राजकीय भूमिका घेतात याकडे सुद्धा लक्ष आहे. गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून समरजित घाटगे यांना चुचकारण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यांनी तुतारी चिन्हावर लढण्यासाठी गळ घालण्याचा प्रयत्न सुरु आहे.


समरजितसिंह घाटगे कोणती भूमिका घेणार?


थेट शरद पवार यांनी सुद्धा दोनवेळा त्यांना संपर्क साधला आहे. मात्र समरजित आजघडीला देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत निकटवर्तीय मानले जातात. त्यामुळे ते तसा निर्णय घेतील का? याची सुद्धा चर्चा रंगली आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून भाजपचं  सुद्धा राजकारण बदललं गेलं आहे. त्यामुळे ज्या पद्धतीने अपक्ष उमेदवारांना 2019 मध्ये भाजपकडून पडद्यमागून बळ देण्याचा प्रयत्न झाला होता. तो प्रयत्न यावेळी होण्याची शक्यता कमीच आहे. त्यामुळे कदाचित समरजित तुतारी हातामध्ये घेऊ शकतात अशी सुद्धा चर्चा कागलसह कोल्हापूरच्या राजकारणामध्ये रंगली आहे. त्यामुळे पुढील काही दिवसांमध्ये समरजित एकला चलो रे भूमिका कायम ठेवून अपक्ष लढणार की तुतारी हातामध्ये घेणार की बंडखोरी करणार? याकडे लक्ष असेल. 


इतर महत्वाच्या बातम्या