कोल्हापूर : कोराना काळात (Covid 19) बंद केलेली कोल्हापूर-मुंबई सह्याद्री एक्स्प्रेस (Kolhapur - Mumbai Sahyadri Express) दोन वर्षानंतर पुन्हा सुरू होणार आहे. मुंबईत सीएसएमटी स्थानकात (CSMT) प्लॅटफॉर्मची लांबी वाढवण्याचे काम सुरु आहे. त्यामुळे ही एक्स्प्रेस 5 नोव्हेंबरपासून ते 31 डिसेंबरपर्यत कोल्हापूर ते पुणे दरम्यान धावणार आहे. त्यानंतर ही एक्स्प्रेस मुंबईपर्यंतही धावणार आहे. सह्याद्री एक्स्प्रेसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांमध्ये आनंदाचं वातावरण आहे.
सह्याद्री एक्सप्रेस फेब्रुवारी 2020 पासून बंद करण्यात आली होती. ट्रेन गेली 30-35 वर्षे धावत होती मात्र कोरोना काळात ही ट्रेन रद्द करण्यात आली होती. गेल्या अनेक महिन्यांपासून प्रवाशांकडून सह्याद्री एक्स्प्रेस सुरु करण्यासाठी सातत्याने मागणी केली जात आहे. ट्रेन सुरू करण्यासाठी प्रवाशांनी तसेच अनेक मंत्र्यांनी पाठपुरवा केला. अखेर कोल्हापुरातून सुटणारी कोल्हापूर ते मुंबई सह्याद्री एक्सप्रेस पुण्यापर्यंत सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 5 नोव्हेंबरपासून रोज रात्री 11.30 वाजता ही रेल्वे कोल्हापुरातील राजर्षी छत्रपती शाहू महाराज स्थानकावरून सुटेल. ती सकाळी 7.45 वाजता पुण्यात पोहचेल. तर पुण्यातून रोज रात्री 9.45 वाजता सुटून कोल्हापुरात पहाटे 5.40 वाजता पोहचणार आहे.
सह्याद्री एक्स्प्रेस त्वरित सुरू करण्याची मागणी
कोल्हापूर-पुणे आणि पुणे-कोल्हापूर मार्गावरील प्रवाशांसाठी या वेळा सोयीस्कर होत्या. कोरोना काळात कोल्हापूर ते मुंबई सह्याद्री एक्स्प्रेस बंद करण्यात आली. त्यानंतर दोन वर्षांचा कालावधी लोटूनही सह्याद्री एक्स्प्रेस सुरू करण्यात आलेली नाही. त्यामुळे हजारो रेल्वे प्रवाशांची गैरसोयीला सामोरे जावे लागते. ज्या महिला मुंबईला जातात, त्यांना तर मोठ्या अडचणीला सामोरे जावे लागते. त्यामुळे सह्याद्री एक्स्प्रेस त्वरित सुरू करण्याची मागणी होत होती.
जुलै महिन्यात खासदार महाडिक यांनी रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची भेट घेत कोल्हापूर रेल्वे स्थानकाच्या सुधारणा आणि नव्या रेल्वे गाड्यांसाठी चर्चा केली. मिरज ते कोल्हापूर या रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण मंजूर असूनही काही कारणास्तव हे काम रखडले आहे. त्याबाबतही खासदार महाडिक यांनी रेल्वे मंत्र्यांचे लक्ष वेधले. लवकरच मिरज ते कोल्हापूर रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणाचे काम सुरू होईल आणि त्यानंतर कोल्हापूरहून आणखी काही नव्या रेल्वे गाड्या सुरू करता येतील, असे आश्वासन रावसाहेब दानवे यांनी दिले. कोल्हापूर ते मुंबई सुपरफास्ट एक्स्प्रेस किंवा वंदे भारत एक्स्प्रेस यासह अन्य काही नवीन मार्गांवर रेल्वे गाड्या सुरू कराव्यात, यासह कोल्हापूरच्या रेल्वे मागण्यांबाबत, खासदार महाडिक यांनी नामदार दानवे यांच्याशी सकारात्मक चर्चा केली. तसेच सह्याद्री एक्स्प्रेस बंद असल्याने प्रवाशांचे अतोनात हाल सुरु असून गेल्या दोन वर्षांपासून बंद असल्याने सातत्याने ही गाडी सुरु करण्याची देखील मागणी केली होती.
हे ही वाचा :