कोल्हापूर : बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांची खंडणी प्रकरणामध्ये निर्घृण हत्या झाल्यानंतर बीडमधील दंडेलशाही राज्यासमोर आली होती. हा घृणास्पद प्रकार ताजा असताना कोल्हापूरमध्ये सुद्धा आता सत्ताधारी भाऊकडून दोन लाखांची खंडणी न मिळाल्याने थेट हँडलूम प्रदर्शनाचा मंडप अचानक कोसळण्यासाठी 'हातभार' लावला का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. त्यामुळे कोल्हापूरमधील पुन्हा एकदा उद्योजकांमधील भुरट्या भाऊंची दहशत पुन्हा एकदा समोर आली आहे. रविवारी अचानक मंडप कोसळल्याने या प्रकरणाला वाचा फुटली असून धमकीचा कॉल सुद्धा मीडियामध्ये व्हायरल झाला आहे. मंडपाच्या खांबाना आधार देण्यासाठी बाजूने जे लोखंडी क्रॉस लावतात ते काढण्यात आल्याने मंडप अचानक कोसळला. सुदैवाने त्या ठिकाणी टेम्पो असल्याने कोणती जीवितहानी झाली नाही. मात्र भाऊच्या मोगलाईची सर्वत्र चर्चा रंगली आहे. धास्तावलेल्या व्यावसायिकांनी या प्रकरणामध्ये कोणतेही न तक्रार न देता पुन्हा कोल्हापुरात पाय न ठेवण्याचा निर्णय घेत त्यांनी काढता पाय घेतला आहे. 


खंंडणीसाठी सत्ताधारी भाऊचीच मोगलाई 


कोल्हापूरमध्ये गेल्या काही दिवसांपासून ऐतिहासिक दसरा चौकामध्ये परप्रांतीय व्यावसायिकांकडून हँडलूम प्रदर्शन सुरू होतं. मात्र, प्रदर्शन सुरू झाल्यानंतर नेहमीप्रमाणे या ठिकाणी संबंधित व्यवसायिकांना खंडणीसाठी त्रास देण्यास सुरुवात झाली. हा त्रास देणाऱ्यांमध्ये दुसरे तिसरे कोणी नसून सत्ताधारी पक्षाचाच भाऊ होता. तो जिल्ह्यात महत्वाच्या पदावर आहे. त्यामुळे खंडणीची चटक लागलेल्या या सत्ताधारी भाऊने त्याचा मध्यस्थी विशालकडून या व्यवसायिकांना गेल्या काही दिवसांपासून सतत दोन लाखांच्या खंडणीसाठी धमकावण्यास आणि मिळेल त्या मार्गाने कोंडी करण्याचा प्रयत्न केला. 


मात्र, व्यावसायिकांना प्रदर्शनात अल्प प्रतिसाद मिळाल्याने दोन लाखांची खंडणी अशक्यप्राय होती. त्यामुळे थेट भाऊनेच त्यांना फोन करत धमकावण्यास सुरुवात केली. मात्र, खंडणीसाठी प्रतिसाद न मिळाल्याने अत्यंत शिवराळ भाषेमध्ये शिवीगाळ करत, हातपाय तोडतो म्हणत, खंडणीसाठी नेमलेल्या मध्यस्थांना भाऊने फोनवरून धमकी दिली. अत्यंत शिवराळ भाषेत धमकी दिल्याचा प्रकार दिल्याचा कॉल सुद्धा मीडियामध्ये व्हायरल झाला आहे. सत्ताधारी पक्षाचाच भाऊच जर या पातळीवर परप्रांतीयांना धमकावत असेल, व्यापार करू देत नसतील तर या उद्योजकांनी जायचं कुठे असा प्रश्न उपस्थित झाला आहे. 


कोल्हापूरमध्ये उद्यमनगरात खंडणीसाठी झालेला खून ताजा असतानाच आता परप्रांतीय व्यावसायिक सुद्धा अशा पद्धतीने कोल्हापूरमध्ये येऊन खंडणीच्या त्रासाला कंटाळून कोल्हापूरमध्ये येणारच नाही म्हणत असतील तर कोल्हापूरचा विकास होणार तरी कसा असा सुद्धा प्रश्न उपस्थित झाला आहे. धमकीचा कॉल सोशल मीडियामध्ये व्हायरल होऊन सुद्धा कोणतेही कारवाई करण्यात आलेली नाही.


इतर महत्वाच्या बातम्या