Rohit Pawar: शासन आपल्या दारी कार्यक्रमासाठी शासकीय कर्मचाऱ्यांवर जबाबदारी देऊन लोकं आपल्या सोबत असल्याचं दाखवण्याचा प्रयत्न केला जात असल्याची टीका आमदार रोहित पवार यांनी केली. ते कोल्हापुरात (Kolhapur News) आज बोलत होते. कृषी अधिकाऱ्यांना वसुलीच्या सूचना दिल्या आहेत, त्यामुळे कृषी विभागात मोठा भ्रष्टाचार होत आहे. कर्नाटकात 40 टक्क्यांची चर्चा होती महाराष्ट्रात 50 टक्के वसुली सुरू झाल्याचा हल्लाबोलही त्यांनी केला. महाराष्ट्रातील परिस्थिती पाहता राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली पाहिजे, अशी आमचीच नाही तर सामान्य लोकांची देखील अपेक्षा असल्याचे ते म्हणाले.
रोहित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कार्यकारी अध्यक्ष नेमण्यावर भाष्य केले. त्यांनी सांगितले की, शरद पवार साहेबांनी ही घोषणा सर्व पदाधिकाऱ्यांना नेत्यांना विश्वासात घेऊन केली आहे. आम्ही सर्वजण त्याचे पालन करतो. कार्याध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांचे अभिनंदन करतो. आता आम्ही त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करणार आहे.
अजितदादांवर रोहित पवार म्हणाले...
अजित पवार आजच्या घोषणेनंतर नाराज असल्याची चर्चा रंगली आहे. याबाबत बोलताना रोहित पवार म्हणाले की, अजितदादा माध्यमांशी बोलले किंवा न बोलता गेले यापूर्वीच आधीचा इतिहास समजून घेणं आवश्यक आहे. दादा नेहमी मीडिया सोबत बोलतात असे नाही. आता राज्यात मुख्यमंत्री पदानंतर सर्वात महत्वाचे पद हे विरोधी पक्ष नेत्याचे आहे आणि ते पद त्यांच्याकडे आता आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत आहे. एखादे महत्वाचे पद असताना पक्षाचे दुसरे पद असेल तर पक्षावर किंवा राज्यावर अन्याय होतो असे अजितदादांचे मत आहे. दादा यांचे पद महत्वपूर्ण संविधानिक पद आहे.
क्षमता असून सुद्धा महाराष्ट्र मागे पडत आहे
बेरोजगारांवर, शेतकऱ्यांवर आणि कष्टकऱ्यांवर बोला असेच मी विरोधकांना सांगेन. क्षमता असून सुद्धा महाराष्ट्र मागे पडत आहे, त्यावर भाजपचे लोकं बोलत नाहीत. दुसऱ्या पक्षाचा विषय आला की लगेच सर्वजण उड्या मारत बोलतात. त्यांनी कितीही प्रयत्न केला, तरी त्यांच्या मनात जे आहे ते होणार नाही. एवढ्या उड्या मारून ताकद वाया घालवण्यापेक्षा सामान्य लोकांच्या हितासाठी काम करण्यात ताकद घालवा, असा टोलाही त्यांनी लगावला.
इतर महत्वाच्या बातम्या