Kolhapur Crime: कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यात बालिंगामधील कात्यायमी ज्वेलर्स भरदिवसा पडलेल्या सशस्त्र दरोड्यातील दोन आरोपींना अवघ्या 36 तासांमध्ये अटक करून गुन्ह्याचा उलघडा करण्यात कोल्हापूर पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेला यश आलं आहे. दोन आरोपींकडून तब्बल 29 लाख 88 हजार 700 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. त्यामुळे कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात थरकाप उडवणाऱ्या या दरोड्याचा उलघडा झाला आहे. एलसीबीने दरोड्यानंतर तांत्रिक पुराव्यांच्या आधारे शिताफीने तपास करत आरोपी विशाल धनाजी वरेकर (वय 32, रा. आदर्श इंग्लिश मीडियम स्कूलजवळ,कोपार्डे ता. करवीर जि.कोल्हापूर) व सतीश सखाराम पोहाळकर (वय 37, रा. कणेरकर नगर, रिंग रोड, फुलेवाडी, कोल्हापूर) यांच्या मुसक्या आवळल्या. विशाल हा रेकाॅर्डवरील गुन्हेगार आहे. 


आरोपी विशालची कळंबा जेलमध्ये असताना परराज्यातील आरोपींशी मैत्री करून कात्यायनी ज्वेलर्सच्या लुटीचा कट रचल्याचे तपासात समोर आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी विशाल आणि सोनार सतीश यांनी एक स्थानिक व परराज्यातील साथीदारांसोबत हा कट रचला होता. दोघे आरोपी विशालच्या घरी आले होते. एलसीबीच्या पथकाने विशालच्या घरी छापा टाकला असता त्यांनी कात्यायनी ज्वेलर्सवर दरोडा टाकल्याची कबुली दिली. स्थानिक गुन्हे शाखेला सशस्त्र दरोडा रेकॉर्डवरील आरोपी विशाल वरेकर व सोनार सतिश पोहाळकर यांनी त्यांचे स्थानिक व परराज्यातील साथीदार आरोपीनी मिळून केल्याची माहिती मिळाली होती. यामधील दोघे आरोपी विशालच्या घरी आले होते. एलसीबीच्या पथकाने आरोपी विशाल वरेकरच्या घरी जावून छापा टाकून सखोल चौकशी केली. 


उर्वरीत दागिने परराज्यातील आरोपी घेवून गेले 


चौकशीत त्यांनी एक स्थानिक व चार परराज्यातील आरोपींच्या मदतीने कात्यायनी ज्वेलर्सवर दरोडा टाकून गुन्हा केल्याची कबूली दिली. आरोपी विशालच्या घरातून चोरून नेलेल्या सोन्यापैकी 367 ग्रॅम वजनाचे 22,38,700 रूपये किंमतीचे सोन्याचे व गुन्ह्यात वापरलेली चारचाकी स्वीफ्ट डिझायर गाडी व अॅक्टीव्हा मोपेड असा एकूण 29,88,700  रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सदरचे दागिने अटक केलेल्या आरोपींनी चोरीतून त्यांच्या वाट्यास आल्याचे सांगितले. गुन्ह्यातील चोरीस गेलेले उर्वरीत दागिने परराज्यातील आरोपी घेवून गेले असल्याचे प्राथमिक चौकशीत निष्पन्न झाले आहे.


असा रचला कट


विशाल जुना राजवाडा पोलिस ठाण्याकडील फसवणुकीच्या गुन्ह्यामध्ये कळंबा जेलमध्ये असताना त्याची परराज्यातील आरोपीशी मैत्री झाली होती. सदर आरोपी मार्च 2023 मध्ये जेलमधून सुटल्यानंतर एकमेकांच्या संपर्कात होते. या दोघांनी मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात गुन्ह्याचा कट रचला. त्यानुसार परराज्यातून चार आरोपी आरोपी विशालच्या घरी आले होते. विशाल व सदर आरोपींनी 03 ते 05 जून दरम्यान कात्यायनी ज्वेलर्सची रेखी करून तयारी केली होती. आरोपी सतिशच्या मदतीने कोल्हापूरमधील स्वीफ्ट डिझायर गाडी (एमएच -43-डी-9210) चार दिवसांसाठी भाड्याने घेतली. सतिशचे आंबिका ज्वेलर्स 2011 पासून ते 2021 पर्यंत बालिंगा येथील कात्यायनी ज्वेलर्स समोर होते. सध्या ते आंबिका ज्वेलर्स, रंकाळा बसस्टँण्ड परिसरात आहे. तो हव्यासापोटी सदर कटात सहभागी झाल्याचे समोर आले आहे. 


गुन्ह्यात वापरलेली दोन पल्सर मोटर सायकली जुना राजवाडा व राजारामपुरी पोलीस ठाणे हद्दीतून चोरण्यात आल्या होत्या. त्या चोरल्यानंतर सतिशच्या घरी लपवून ठेवल्या होत्या. दरोडा टाकल्यानंतर आरोपी सतिश व विशालने परराज्यातील आरोपींना कात्रज पुणे येथे सोडून आले असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. परराज्यातील आरोपींच्या शोधासाठी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील वेगवेगळी शोध पथके रवाना करणेत आली आहेत.


सदरची कारवाई विशेष पोलीस महानिरीक्षक सुनिल फुलारी, पोलीस अधीक्षक महेंद्र पंडीत, अपर पोलीस अधीक्षक जयश्री देसाई, उपविभागीय पोलीस अधिकारी करवीर विभाग संकेत गोसावी यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे, सहा. पोलीस निरीक्षक सागर वाघ, विनायक सपाटे, शेष मोरे, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक महादेव कुहाडे तसेच पोलीस अंमलदार वसंत पिंगळे, रणजित कांबळे, रणजित पाटील, संजय हुंबे, संजय कुंभार, रामचंद्र कोळी, सुरेश पाटील, अजय वाडेकर, ओंकार परब, अमर वासुदेव, सचिन देसाई, अमर आडुळकर, प्रशांत कांबळे, विनोद चौगुले, सागर कांडगावे, अमित सर्जे, प्रितम मिठारी, सागर मानें, युवराज पाटील, नवनाथ कदम, संदीप गायकवाड, राजू कांबळे, प्रविण पाटील, आयुब गडकरी, विलास किरोळकर, नामदेव यादव, अनिल पास्ते, संतोष पाटील, अनिल जाधव, रफिक आवळकर, राजेंद्र वरंडेकर व स्वाती झुगर यांनी केली.